हुतात्मा एक्‍स्प्रेसला मासिक पासची सुविधा मिळावी - सचिव महावीर शहा

25/04/2011 14:25

सोलापूर - सोलापूर ते पुणे (क्रमांक 2158) हुतात्मा एक्‍स्प्रेस गाडीतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या गाडीला मासिक रेल्वे पासची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी सोलापुर पुणे प्रवासी संघटनेने निवेदनाद्वारे केल्याची माहिती सचिव महावीर शहा यांनी दिली.

पुणे येथील अनेक विभागांची कार्यालये सोलापुरात असल्याने तसेच सोलापुरातील अनेक व्यापारी व मध्यमवर्ग नियमितपणे या गाडीतून प्रवास करीत आहेत. रेल्वेच्या नियमानुसार 150 किलोमीटरच्या पुढे अंतर असल्यास पास देता येत नाही. सोलापूर ते पुणे हे अंतर 267 किलोमीटर इतके असल्याने पासची सुविधा देता येत नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. मात्र मुंबई ते पुणे हे अंतर 192 किलोमीटर आहे. सुरत ते चर्चगेट हे अंतर 267 किलोमीटर इतके आहे. तरीही येथे पास सुविधा उपलब्ध आहे. इंद्रायणी गाडीला स्वतंत्र असा पासधारकांचा डबा उपलब्ध आहे. मात्र सोलापूर ते पुणे असा पास मिळत नसल्याने गैरसोय होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

सध्या प्रवाशांना सोलापूर ते कुर्डुवाडी (250 रुपये), कुर्डुवाडी ते दौंड (310 रुपये) व दौंड ते पुणे (250 रुपये) असे तीन वेगवेगळे पास काढावे लागत आहेत. पुणे ते मुंबईच्या धर्तीवर सोलापूर ते पुणे असा पास खास तरतुदीद्वारे मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे, असे संघटनेचे सचिव महावीर शहा यांनी सांगितले.


solapur pune pravasi sangatana