कुर्डुवाडीत ट्रॅफिक जाम; सामान्यांचे हाल पोलिसांचे नियंत्रण नसल्याने सारेच निर्ढावले ; अतिक्रमण आणि बेशिस्तपणा मुख्य कारणे

16/02/2012 11:11
कुर्डुवाडी
दि. 11 (वार्ताहर)
शहरात सध्या वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, छोटे-मोठे अपघात वाढत आहेत. पार्किगची सोय नाही, गावठाणाची कमतरता, जागोजागी असलेली अतिक्रमणे, दुचाकीस्वारांवर पोलिसांचे नियंत्रण नाही. यामुळे सारेच निर्ढावले आहेत. यात नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.
जीप, बोलेरो अशा प्रवासी वाहतुकीच्या गाडय़ा सध्या प्रांत कार्यालय कर्मचारी वसाहतीच्या समोरच्या बाजूला पार्किग करण्यात येतात. मालवाहतूक टेम्पो, रिक्षा, छोटा हत्ती, टमटम आदी गाडय़ा या बालोद्यानाला लागून माढा रोडने पार्किग केलेल्या असतात.

कुर्डुवाडी शहरात मोठा मालधक्का आहे. बालोद्यान ते आंबेडकर पुतळा याला रेल्वेच्या जागेवरून जाणारा समांतर मार्ग होता; पण रेल्वे प्रशासनाने अचानकच बंद केल्याने मालगाडय़ांना जा-ये करण्यासाठी मुख्य रस्ताच आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण असल्याने एकच वाहन रोडने जाते व वारंवार ट्रॅफिक जाम होते.
माढामार्गे जाणा:या एसटी बसही याच मार्गाने जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बसवाले वाटेवर कोठेही सिग्नल इंडिकेटर न देता थांबतात. त्यामुळे दुचाकीधारकांना आपला जीव मुठीत धरून गाडी चालवावी लागते. यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी हे करतो असे जरी चालक म्हणत असले तरी नागरिकांना होणा:या त्रासाचेही त्यांना भान नसते.
शहरातील मुख्य रस्ता म्हणून टेंभुर्णी रोड ते माढा रोड मात्र या रोडवरच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमणे असल्याने वाहनचालकांना कसरतीनेच जावे लागते. बालोद्यानाजवळ असलेले फळविक्रेते, चायनीज, पावभाजीवाले एका बाजूने तर दुस:या बाजूने पोलीस स्टेशनच्या कंपाउंडला लागून असणारे चहा विक्रेते यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुमारे 12-12 फूट अतिक्रमण केले आहे. तर पुढे टेम्पो, मालवाहतूक टमटम, छोटा हत्ती अशा अनेक गाडय़ा पार्क केलेल्या असतात तर समोरच्या बाजूने दुकानदारांनी केलेली अतिक्रमणे आहेत.
तेथून पुढे गोडाऊनला लागून अनेक दुकाने थाटली आहेत व समोरच्या बाजूला जनरल स्टोअर्स, कापड विकणारे असतात. पुढेही अनेकांनी अतिक्रमणे थाटली आहेत. मंडईच्या समोरही अतिक्रमणे आहेत.
ठोस कारवाई हवी तरच वाहतूक सुरळीत
गाडय़ा रस्त्याच्या मधोमध लावून मित्रासोबत गप्पा मारणे हा तर
कुर्डुवाडी येथील तरुणांचा मोठा शौकच आहे. गाडी काढा म्हणून सांगितले तरी भांडणे ही हमखास होणारच, अशी अवस्था आहे. मिठाई गल्ली ते गांधी चौक, टिळक रोड ते गांधी चौक, शिवाजी चौक ते गांधी चौक या रेाडवर दुतर्फा पार्किग असल्याने रस्ता अवघा 7 फुटाचाच उरतो. त्यामुळे वाहन काढताना किंवा चालवताना हमखास दोन-तीन गाडय़ांना किंवा थांबलेल्या लोकांना धडकतात. नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी याबाबत लक्ष घालून ट्रॅफिक जाम काढण्याचा फार्स करण्यापेक्षा ठोस कारवाई करावी, जणे करून वाहतूक सुरळीत होईल.

solapur pune pravasi sangatana