कुर्डूवाडीजवळ नागरकॉईल एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले

07/05/2011 11:21

कुर्डूवाडी, दि. ६ (वार्ताहर)- मुंबई-नागरकॉईल एक्स्प्रेस कुर्डूवाडीहून सोलापूरकडे निघाल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवरून मुख्य लाईनवर येत असताना सांदा न पटल्याने व स्लीपरच्या पिना तुटल्याने इंजिनसह दोन डबे रुळावरून खाली उतरले. ही घटना शुक्रवारी रात्री ७.५२ वाजता घडली. या घटनेमध्ये प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही.
गाडी क्रमांक १६३३९ मुंबई-नागरकॉईल एक्स्प्रेस ही शुक्रवारी रात्री ७.४५ वाजता कुर्डूवाडी रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आली. येथील थांबा घेतल्यानंतर पुढे सोलापूरच्या दिशेने निघाली असता पॉइंट क्रमांक १२२ ए ओपन राहिल्याने सांदा न पटल्याने व ट्रॅक सोडत असताना काही स्लीपरच्या पिना तुटल्याने जोरात आवाज होऊ लागला व गाडीमधील प्रवाशांना हादरे बसू लागले. सदरचा प्रकार लक्षात येताच चालकाने गाडी थांबविली तोपर्यंत इंजिन व त्यापाठीमागील एसएलआर बोगी क्रमांक २७३१ व जनरल बोगी क्रमांक एसआर ११४०१ रुळावरून तीन फूट खाली उतरली.
कुर्डूवाडी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार वरून नागरकॉईल निघाली असतानाच मुख्य लाईनवर येण्यापूर्वीच ही घटना घडली. गाडीला स्पीड नव्हता. त्यामुळे दुर्घटना घडली नाही. सदरचा प्रकार समजल्यानंतर कुर्डूवाडी मेडिकल हॉस्पिटलची टीम, सोलापूर व दौंड येथील मेडिकल व्हॅन घटनास्थळी पाठविण्यात आली होती. सोलापूरहून विविध विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
रात्री ९ वाजता नागरकॉईल एक्स्प्रेसमधील २१ डब्यांपैकी १९ डबे मुख्य एक्स्प्रेसमधून बाजूला करून पाठीमागे प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर घेण्यात आले. इंजिनसह दुर्घटनाग्रस्त दोन डबे घटनास्थळीच ठेवण्यात आले. रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक ए. के. प्रसाद यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झालेले आहेत. दुर्घटनाग्रस्त डबे काढण्यासाठी दौंड येथून क्रेन मागविण्यात आलेले आहे. कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनजवळच ही दुर्घटना घडली.


solapur pune pravasi sangatana