देवाच्या गाडीचे चाचणी इंजिन शेतकऱ्यांनी आरगमध्ये रोखले

07/03/2011 15:03

आरग - येथील रेल्वेस्थानकावर फाटक व्हावे, यासाठी ग्रामस्थांनी देवाच्या गाडीचे चाचणीचे इंजिन रोखून धरले. तात्पुरत्या स्वरूपात फाटकाची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. दरम्यान, सलगरेत आज वारकऱ्यांनी इंजिनाचे उत्साहात स्वागत केले.

पंढरपूर ते मिरज रेल्वेमार्गाच्या चाचणीसाठी सलगरेहून आज इंजिन आरगमध्ये आले. सध्याच्या जुन्या स्थानक इमारतीपासून सुमारे शंभर फुटांवर नवी इमारत उभारली आहे. जुन्या इमारतीजवळ फाटक करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तसे निवेदनही रेल्वे खात्याला देण्यात आले होते. आज प्रत्यक्ष चाचणीची प्रक्रिया सुरू झाली; तेव्हा मात्र गेटसाठी कोणतीही तयारी नसल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. सरपंच गणपती पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, गजानन कोरबू, सदस्य सर्जेराव खटावे आदींनी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत चाचणी इंजिन रोखून धरले. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तात्पुरत्या स्वरूपात गेट तयार करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले; त्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली. दरम्यान, विभाग अभियंता डावरे यांनी ग्रामस्थ आक्रमक झाल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कामाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला.
दरम्यान, इंजिनाचे सलगरेमध्ये आज स्वागत करण्यात आले. सलगरेच्या सरपंच नंदाश्री निंबाळकर, उपसरपंच तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य रामदास पाटील आदींनी सलगरेमध्ये इंजिनाचे स्वागत केले. अनेक वारकऱ्यांनी त्याचे पूजन करून जल्लोष केला. दुपारी इंजिन बेळंकीमध्ये, त्यानंतर आरग स्थानकात आले.

काटेकोर चाचणी
रुळांच्या जोडण्या, त्यांचा समतलपणा, परस्परातील रुंदी याची अतिशय काटेकोर चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे इंजिन अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत आहे. आरगपासून मिरजेच्या दिशेने अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. रुळांची जोडणीही झालेली नाही. इंजिन आले तरीही आरग स्थानकावर रुळांची जोडणी सुरूच होती. त्यामुळे ते तेथेच थांबून राहिले
.


solapur pune pravasi sangatana