नागरकोईल एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा, सोलापूर स्थानकात प्रवाशांनाच पोलिसांचा प्रसाद

08/11/2011 17:52
सोलापूर - नागरकोईल एक्सप्रेस गाडीवर कुर्डूवाडीजवळ सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. नागरकोईल एक्सप्रेस  सोलापूर स्थानकात आल्यानंतर संपप्त प्रवाशांनी रेलरोको केला. दिड तास नागरकोईल एक्सप्रेस सोलापूर स्थानकात रोखून धरण्यात आली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करुन चोरांना सोडून प्रवाशांनाच बेदम चोप दिला. यात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकार, छायाचित्रकार  आणि  वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन यांना देखील पोलिसांनी मारहाण केली.

नागरकोईल एक्सप्रेस कुर्डूवाडी सोडून पुढे निघाल्यानंतर काही अंतरावर थांबली. प्रवाशांना काही कळण्याच्या आत ६ सशस्त्र दरोडेखोर गाडीत घुसले त्यांनी महिलांच्या अंगावारील दागिने तलवार, चाकूचा धाक दाखवून लुटले. जवळपास १५ ते २० मिनीट दरोडेखोरांचा हैदोस सुरु होता. त्यानंतर गाडी सोलापूर स्थानकात आल्यानंतर संतप्त प्रवाशांनी दरोडेखोरांना पकडण्याची मागणी करीत रेलरोको केला. यावेळी पोलिसांनी प्रवाशांवर बळाचा वापर केला. यात अनेक प्रवाशांना जबर मारहाण करण्यात आली. 

प्रवाशांनी या प्रकरणाची दाद रेल्वे प्रशासनाकडे मागितली. रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुशील गायकवाड यांनी झाल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ज्या पोलिसांनी प्रवाशांना अमानूष मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.

solapur pune pravasi sangatana