पावसाने मध्य रेल्वे कोलमडली; वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

05/07/2010 12:51

 येत्या ४८ तासांत  मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, ३ जुलै / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आज शनिवारी विकएण्डचा मुहूर्त साधत मुंबईकारांना दणका दिला. सकाळी साडेअकरा-बारा वाजेपर्यंत पावसाचे काहीही चिन्ह नव्हते. नंतर मात्र पावसाने आपला इंगा दाखवला. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले. पश्चिम उपनगरात तुलनेत कमी पाऊस झाला. दुपारी अडीच-तीन नंतर काही काळ शांत झालेल्या  पावसाचा जोर संध्याकाळी पुन्हा वाढल्याने कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. या मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवार उडाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती. आजच्या पावसाने पुन्हा एखदा पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी खबरदारी घेतल्याच्या पालिका आणि रेल्वेच्या दाव्यांचा भंडाफोड झाला. उद्याही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज कुलाबा वेध शाळेने व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्या होत्या. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा होतीच. आज सकाळी अकरा नंतर मुंबईत शहर परिसरात पावसास सुरुवात झाली. दुपारी अडीच वाजेपर्यंत कुलाबा येथे ७६.१ तर सांताक्रूझ येथे १८.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महापालिकेने मुख्यालयासह प्रभाग कार्यालयात बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापकावर रात्री पर्यंत शहर परिसरात ११६.१७ मिलिमीटर तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे९४.१५ व ३९.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कुलाबा येथे १०७ मिलिमीटर तर सांताक्रुझ येथे ७३.०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पावसाने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णत: कोलमडली. घाटकोपर ते दादर या प्रवासाला दुपारी दीड ते पावणेदोन तास वेळ लागत होता. माटुंगा, शीव, परळ, करीरोड आदी स्थानकादरम्यान रेल्वेरूळ पाण्याखाली गेले होते. त्या ठिकाणी रूळावरील पाणी उपसण्यासाठी पंप लावण्यात आले होते. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यामुळे रेल्वे वाहतूक मंद गतीने सुरू होती. रात्री उशिरापर्यंत मध्य रेल्वेच्या गाडय़ा तास-दिड तास विलंबाने धावत होत्या. एवढेच नव्हे तर या गाडय़ाही कासवगतीने चालविल्या जात असल्याने सर्वच स्थानकांत प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. नेहमी तासाभरात घरी पोहचणाऱ्या प्रवाशांना आज तासंतास रेल्वेत घालवावा लागत होता. हार्बर रेल्वे मार्गातही वडाळा येथे रूळावर पाणी साचल्याने  गाडय़ा विलंबाने धावत होत्या. परिणामी दिवसभारात मध्य रेल्वेला ७५ गाडय़ा रद्द कराव्या लागल्या. रात्री उशिरापर्यत मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच होते. तर पश्चिम रेल्वेच्या  दादर, लोअर परेल आणि एल्फिंस्टन स्थानकारत रूळावर पाणी साचले होते. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकल सुमारे १५ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र जलद लोकल वेळापत्राकनुसार धावत होत्या, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारच्या अध्र्या दिवसामुळे दुपारनंतर छत्रपती शिवाजी टर्मिनससह सर्वच रेल्वे स्थानकात नोकरदारांची मोठी गर्दी उसळली होती. महालक्ष्मी मदिर, कॅडबरी जंक्शन, शिंदेवाडी, हिंदमाता, शीव कोळीवाडा, सरदार नगर क्रमांक-१, महापालिका शाळेसमोर, वरळी नाका, डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्ग, वडाळा, टाटा कंपाऊंड-परळ, कुर्ला पश्चिम येथे बालाजी मंदिर मार्ग, चेंबूर कॅम्प, भाजी मार्केट, ओल्ड बॅरॅक, देवनार येथील नंदादीप को. ऑ. हौ. सोसायटी, सांताक्रूझ (पूर्व) येथील कालिना मिल्रिटी कॅम्प, वाकोला येथील दत्त मंदिर, हनुमान नगर आदी ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे जागोजागी वाहतूक कोडी झाली होती. परिणामी बेस्ट बसेसही विलंबाने धावत होत्या.
टागोरनगर लालसिंह चव्हाण चौक, विक्रोळी (पूर्व) येथे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घर पडल्याची तसेच कुर्ला (पूर्व) कसाईवाडा येथे दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे महापालिका नियंत्रण कक्षाकडून तर झाडे पडण्याच्या काही तक्रारी अग्निशमन दलाकडे आल्या होत्या.गोवंडी, वडाळा, धारावी, वरळी, देवनार, चेंबूर, विहार दादर आदी ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडल्याचे महापालिका नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
दरम्यान राज्याच्या अनेक भागात आज मुसळधार पाऊस झाला असून काही ठिकाणी भींत कोसळणे, दरडी कोसळणे अशा दूर्घटना घडल्या. येत्या ४८ तासात मुंबईसह राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनवर्सन सचिव सहारिया यांनी दिली.

 


solapur pune pravasi sangatana