पावसामुळे कोकण रेल्वे वाहतूक मिरजमार्गे

22/07/2011 16:01

मिरज - पावसामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली आहे. या मार्गावरील काही गाड्या मिरजमार्गे सोडण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने राजधानी एक्‍स्प्रेस, मंगला एक्‍स्प्रेस, मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस यांचा समावेश आहे. दरम्यान, हजरत निजामुद्दीन-त्रिवेंद्रम राजधानी एक्‍स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने ती आज दोन तास मिरज जंक्‍शनमध्येच अडकून पडली. दुरुस्तीनंतर संध्याकाळी पावणेसात वाजता मार्गस्थ झाली.

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळत आहेत. शनिवारी पोमेंडीजवळ दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. परिणामी या मार्गावरून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या रविवारपासून मिरजमार्गे वळवण्यात आल्या. यामुळे या गाड्यांना अनेक तासांचा विलंब होत आहे. गाड्या वाढल्याचा ताण मिरज जंक्‍शनमधील यंत्रणेवर पडत आहे.

स्थानक अधीक्षक मोहनशंकर शंकर मसूद यांनी सांगितले, की मिरज स्थानकातून दिवसभरात धावणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या सध्या 92 वर गेली आहे. त्यातच अधूनमधून सोडल्या जात असलेल्या जादा गाड्यांमुळे ही संख्या शंभरावर पोहोचत आहे. स्थानकातील उपलब्ध रेल्वेमार्ग आणि अन्य यंत्रणेवर याचा ताण आहे. स्थानक 24 तास व्यस्त आहे. प्लॅटफार्म क्रमांक एकची दुरुस्ती सुरू असल्याने तो सध्या बंद आहे. उर्वरित पाच पैकी चारच प्लॅटफार्म प्रामुख्याने वापरात आहेत. कोकणातील गाड्या मिरजमार्गे वळवल्याने ताण वाढला आहे.

दरम्यान, हजरत निजामुद्दीन-त्रिवेंद्रम (12432) राजधानी एक्‍स्प्रेसदेखील मिरज-बेळगाव-लोंढा-मडगावमार्गेच धावत आहे. इंजिनमधील बिघाडामुळे आज तब्बल दोन तास ती येथे अडकून पडली. इंजिन आणि संलग्न बोगी यांना जोडणाऱ्या कपलिंगमधील बिघाडामुळे डबे जोडले जात नव्हते. अभियंत्यांनी खटपट करून ते जोडले. बिघाड झालेले अन्य एक इंजिन मिरजेतच सोडून देण्यात आले. लोंढ्यामध्ये दुसरे इंजिन त्याला जोडण्यात येईल, असे सांगण्यात आले.

सौंर्दयवती राजधानी
कोणतीही राजधानी एक्‍स्प्रेस मिरजमार्गे धावत नाही. एखादी आलीच तर ती मिरज स्थानकात थांबत नाही. त्यामुळे आज येथे थांबलेल्या "राजधानी'चा अनुभव प्रवाशांसाठी वेगळाच होता. दुपारी साडेचार वाजता हजरत निजामुद्दीन-त्रिवेंद्रम ही राजधानी मिरजेत आली. तिच्या इंजिनात बिघाड झाल्याने दोन तास ती स्थानकात थांबली. आकर्षक लालभडक असलेली गाडी सर्वसोयींनीयुक्त आहे. तिचे तिकीट विमानाच्या तिकिटांशी स्पर्धा करते. गाडीमध्ये चहा-नाश्‍ता, जेवणापासून अंथरुण-पांघरुणापर्यंत सर्व सेवा रेल्वेकडूनच दिल्या जातात. स्वच्छतागृहामध्ये चक्क शॉवरची सोय असणारी ही गाडी जणू रेल्वेची सौंर्दयवतीच ठरावी.


solapur pune pravasi sangatana