प्रवाशांची काळजी घ्या, वर्ल्ड बँकेचा आदेश

12/06/2010 11:41

 प्रवाशांची काळजी घ्या, वर्ल्ड बँकेचा आदेश

आमची मदत हवी असेल तर रेल्वे प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था वाढवा आणि अपघात कमी करा असा आदेश वर्ल्ड बँकेने मुंबई उपनगरी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला आहे. बँक आता उपनगरी रेल्वे सुधारण्यासाठी १९१० कोटी रूपयांचे कर्ज देणार आहे. पण ही रक्कम देण्यापूर्वी, बँकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी एक इमेल पाठवून, प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था काय आहे याची विचारणा केली आहे.

दरवर्षी सुमारे ३५०० प्रवासी उपनगरी रेल्वे अपघातांत मृत्यू पावतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवणाऱ्या संघटनेचा दावा आहे की, रेल्वे प्रशासनाने योग्य उपाय केले तर यापैकी अनेकांचा जीव वाचू शकेल. यापैकी रेल्वे स्टेशन्सवर अपघातग्रस्तांसाठी प्रथमोपचार पुरवणे ही तातडीची बाब आहे असे संघटनेचे म्हणणे आहे. या बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले पण आता बँकेने लक्ष घातल्याने हा मामला अग्रक्रमाने सोडवावा लागेल असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचे अपघात ही सर्वांत मोठी समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आयआयटी आणि जेजे स्कुल ऑफ आर्ट यांची मदत मागितली आहे. पण यासाठी आर्ट स्कुलची मदत मागणे म्हणजे पैशाची नासाडी आहे असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान कल्याण येथे रूळ ओलांडताना पोलिस कॉन्स्टेबल सुहास दौंड हे लोकलखाली आल्यामुळे मरण पावले.


solapur pune pravasi sangatana