प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल

10/05/2011 11:31

भुसावळ - सध्या सर्वच शाळांना सुट्या लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वे आणि बसस्थानके फुलली आहेत. मुंबईत कामानिमित्त राहणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांनी लग्न व सुटीनिमित्त गावाकडे जात आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, दिल्लीकडे जाणाऱ्या डाऊनच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी होत आहे.

सध्या लग्नसराई आणि शाळांना सुटी लागल्याने अनेक हौशी मंडळी बाहेरगावी फिरायला, पर्यटनाला जातात. यासाठी अनेकांनी तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या विविध गाड्यांचे आरक्षण करून ठेवले आहे. ज्यांना आरक्षण मिळाले नाही ते आता तत्काळ सुविधेचा लाभ घेऊन आरक्षण करीत आहेत. तत्काळमध्ये नंबर लागला नाही, तर थेट गाडीवर जाऊन तिकीट निरीक्षकांना जागेसाठी विनंती करणारेही कमी नाहीत. मुळातच प्रतीक्षा यादीच लांबलचक असल्याने तिकीट निरीक्षकांना प्रवाशांची समजूत काढताना नाकीनऊ येत आहे.

जूनमध्ये मुंबईकडे गर्दी
सध्या दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी आहे. एक ते दहा जूनदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी होते. उत्तर भारतात गेलेले मुंबई किंवा इतर ठिकाणी कामगार पुन्हा महाराष्ट्रात परतत असल्याने ही गर्दी वाढते.
दरम्यान, आताही मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी असली, तरी खच्चाखच प्रवासी भरून गाड्या धावत नाहीत. अनेकवेळा हॉलिडे स्पेशल गाडी बोटावर मोजण्या इतपत प्रवासी घेऊन धावते.

बसेस हाऊसफुल्ल
उन्हामुळे अनेकांचा कल एसटीऐवजी रेल्वेकडे असतो. मात्र, रेल्वेत आरक्षण मिळणे कठीण झाल्याने काहींनी नसता त्रास नको, म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य दिले आहे. भुसावळ आगारात महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात लांबपल्ल्याच्या बसेस धावत असल्याने प्रवाशांची बऱ्यापैकी सोय झाली आहे. मात्र, बसस्थानकाचे नूतनीकरणाचे रेंगाळलेले काम प्रवाशांच्या अडचणीचे ठरत आहे.


solapur pune pravasi sangatana