मरगळलेल्या रेल्वेचा तिजोरीला भार ?

13/03/2012 15:44
आधुनिकीकरणासाठी साडेपाच लाख कोटींची गरज
नव्या सहस्रकाने जगाच्या प्रगतीचा वेग वाढविला असला तरी भारतीय रेल्वे मात्र मरगळलेलीच आहे. रेल्वेची कार्यक्षमता दिवसागणिक घटत चालली असून  सुरक्षा व्यवस्थाही ढासळत आहे. प्रवासी तसेच मालवाहतुकीतून मिळणाऱ्या राष्ट्रीय महसुलातील रेल्वेचा वाटा कमालीच घसरला असून याच पद्धतीने रेल्वे खाते धावत राहिले, तर भारतीय रेल्वे हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील गंभीर बोजा ठरेल, असा इशारा सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने सरकारला दिला आहे. यातून रेल्वेला बाहेर काढण्यासाठी ५,६०,३९६ कोटींची आधुनिकीकरणाची पंचवार्षिक योजनाही या समितीने सुचविली असून, यासाठी लागणाऱ्या निधीचा मोठा वाटा प्रवाशांकडून अधिभाराच्या रूपात वसूल केला जाईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
रेल्वेसेवेची ही घसरण तातडीने थांबविली तरच भविष्यात पुन्हा रेल्वेसेवा कार्यक्षम आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण होऊन देशाच्या आर्थिक उन्नतीला हातभार लावू शकेल असे या समितीचे मत आहे. त्यासाठी येत्या पाच वर्षांचा रेल्वेसेवेच्या आधुनिकीकरणाचा १५ कलमी कार्यक्रमच या समितीने रेल्वेमंत्र्यांना सादर केला आहे. याची अंमलबजावणी लगेचच करण्याचे सरकारने ठरविले, तर गेल्या अनेक वर्षांत रोखल्या गेलेल्या प्रवासी भाडेवाढीचा फटका या अर्थसंकल्पात अपरिहार्य ठरेल असे दिसते. पाच लाख ६० हजार कोटींच्या आधुनिकीकरण कार्यक्रमासाठी निधी उभारणी करताना अर्थसंकल्पीय तरतूद हा महत्त्वाचा स्रोत राहणार असून भाडेवाढीसारखे महसुलवाढीचे उपाय, रेल्वेच्या पडीक मालमत्तांच्या विकासातून निधी उभारणी तसेच वित्तसंस्था व देशी-विदेशी शेअरबाजारातून कालबद्ध रीतीने पैसा उभा करण्याच्या योजना आखाव्यात, असेही या समितीने सुचविले आहे.
रेल्वे आधुनिकीकरणाच्या १५ कलमी पंचवार्षिक कार्यक्रमासाठी लागणाऱ्या या निधीपैकी ३३ हजार कोटींचा निधी रेल्वेमार्ग व पूल बांधणी-मजबुतीकरणासाठी तर २५ हजार कोटी सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी लागणार आहे. रेल्वे स्थानके आणि टर्मिनल्सच्या आधुनिकीकरणासाठी खाजगी क्षेत्राचे सहकार्य घेण्याचा पर्याय समितीने सुचविला असून त्यासाठी १.१० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे वाहतूक सेवेचा वेग वाढविण्यासाठी सध्याच्या १९ हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे आधुनिकीकरण आवश्यक असून तसे केल्यास रेल्वेचा वेग दुप्पट वाढू शकेल असा या समितीचा अंदाज आहे. रेल्वेमार्गाच्या जाळ्यात एक लाख ३१ हजार पूल आहेत, त्यापैकी जवळपास ३३ हजार पूल १०० वर्षांंहूनही अधिक जुने आहेत. या पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याची शिफारस समितीने केली आहे.    

अहमदाबाद मुंबई ‘बुलेट ट्रेन’
मुंबई- अहमदाबाद दरम्यानचे अंतर ताशी ३५० किलोमीटर वेगाने कापू शकेल अशा क्षमतेचा रेल्वेमार्ग बांधण्याची शिफारसही पित्रोदा समितीने केली आहे. हा मार्ग खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने दहा वर्षांत बांधल्यास सुमारे ६० हजार कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज समितीने वर्तविला आहे.

निधी उभारणीचे उपाय-
* रेल्वेच्या सार्वजनिक सेवांतून निर्गुतवणूक
* रेल्वे वसाहतीमधील अतिरिक्त जमिनींचा व्यापारी वापर
* रेल्वेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळा व इस्पितळांचे व्यापारीकरण
* प्रवाशांकडून आधुनिकीकरण अधिभाराची वसुली

solapur pune pravasi sangatana