महाराष्ट्र एक्‍स्प्रेसमध्ये 46 हजारांची चोरी

13/03/2012 15:35
 वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोघा विद्यार्थ्यांच्या 46 हजार रुपयांचे साहित्य असणाऱ्या बॅगा गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्‍सप्रेस (11040) मधून आज पहाटे चोरीस गेल्या.

मीना प्रमोद सांगळे (वय 18, रा. एरंडोल, जि. जळगाव) आणि निखिल अनिल भालेराव (18, रा. अमळनेर, जि. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत. दोघेही वालचंद महाविद्यालयात बीटेक्‌च्या वर्गात शिकतात. काल रात्री ते गोंदिया एक्‍सप्रेसमध्ये एस-7 बोगीमध्ये सांगलीला येण्यासाठी बसले होते. पहाटे सव्वाचार वाजता गाडीने पुणे स्थानक सोडले. घोरपडी स्थानक आल्यानंतर निखिलला आपली बॅग जाग्यावर नसल्याचे समजले. शोधाशोध करत असताना मीनाचीही बॅग गायब असल्याचे स्पष्ट झाले. निखिलच्या बॅगेत लॅपटॉप, तीन हजार रुपये रोख, एटीएम कार्ड, कपडे व अन्य साहित्य असा 34 हजार सहाशे रुपयांचा ऐवज होता. मीनाच्या बॅगेत पाच हजार रुपये रोख आणि 6 हजार 600 रुपयांचे अन्य साहित्य होते. गाडीतील तिकीट तपासणीसाकडे त्यांनी चौकशी केली; तसेच पोलिसांनाही कल्पना दिली. चोरी झाल्याने विद्यार्थी हादरले होते. निखिलच्या लॅपटॉपमध्ये बऱ्याच शैक्षणिक फाईल्स होत्या. मिरज रेल्वे पोलिसांत त्यांनी चोरीची फिर्याद दिली. पुणे पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

solapur pune pravasi sangatana