मेट्रो सर्वपक्षीय एकीच्या ट्रॅकवर

05/07/2010 13:09

मेट्रो सर्वपक्षीय एकीच्या ट्रॅकवर 

शहरात होणाऱ्या बहुचचिर्त मेट्रो प्रकल्पाने पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांना एकाच 'ट्रॅक'वर आणले आहे. या प्रस्तावास पूर्ण पाठिंबा देत, त्याचा पाठपुरावा राज्य सरकारकडे करू, असे आश्वासन पक्षभेद विसरून आमदारांनी दिले. मात्र मेट्रोसाठी सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ मंडळाची नेमणूक करण्यात यावी, अशी सूचनाही समोर आली.

मेट्रोबाबत शहरातल्या आमदारांची मते जाणून घेण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाने चर्चा आयोजित केली होती. यात शिवसेनेचे आमदार चंदकांत मोकाटे, महादेव बाबर, राष्ट्रवादी काँगेसचे बापू पठारे, भाजपच्या माधुरी मिसाळ, काँगेसचे विनायक निम्हण आणि दिप्ती चवधरी, मनसेचे रमेश वांजळे सहभागी झाले. शहराची लोकसंख्या वाढली आहे. रस्तेही अरुंद आहेत. मंडई, तुळशीबाग, लक्ष्मीरोडसारख्या भागातून मेट्रो कशी नेणार, स्टेशन्स कुठे असणार, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मोकाटे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचा मेट्रोला विरोध असल्याचे चुकीचे चित्र निर्माण होते आहे. सेनेने विकास कामांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. फक्त प्रकल्पाची अमलबजावणी योग्य पद्धतीने केली जावी, अशी आमची मागणी असल्याचे बाबर यांनी नमूद केले.

पालिकेतच प्रस्ताव पास व्हायला वर्ष जावे लागले. प्रस्ताव टप्प्या-टप्प्याने पुढे जाईल. महापौरांनी भूमिपूजनाची तारीख जाहीर केली; पण तोपर्यंत प्रस्ताव पुढे सरकणार का, असा प्रश्न निम्हण यांनी उपस्थित केला. त्यावर, मेट्रोचा प्रस्ताव सहा आठवड्यात पुढे सरकला पाहिजे, यासाठी सर्व आमदार प्रयत्न करतील, असे आश्वासन पठारे यांनी दिले. येत्या अधिवेशनात प्रस्तावासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.


solapur pune pravasi sangatana