राज्यभरातील एसटीचालकांची होणार आरोग्य तपासणी

08/02/2012 15:55
विशेष प्रतिनिधी , मुंबई
altराज्यभरातील एसटीच्या सर्व चालकांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन गंभीर आजार असलेल्या चालकांना अन्य काम दिले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य तपासणीची विशेष मोहीम ११ फेब्रुवारीपासून राबविली जाणार असून सर्व अहवाल एसटीच्या मुख्य कार्यालयात मागविण्यात आले आहेत. चालकांची आरोग्यतपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच मानसिकता तपासावी, अशी टीका महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे.
पुण्यात संतोष माने या बसचालकाने भीषण प्रकार केल्यावर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले असून चालकांच्या आरोग्य तपासणीचे आदेश आता जारी करण्यात आले आहेत. सध्या ४० वर्षांपर्यंत दर दोन वर्षांनी आणि नंतर दरवर्षी केवळ नेत्रतपासणी केली जाते. पण आता चालकांची शारीरिक क्षमता तपासणी आणि वैद्यकीय तपासणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ११ फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविली जाईल. विशेष वैद्यकीय अधिकारी बोलावून प्राथमिक तपासणीबरोबरच मधुमेह,रक्तदाब, हृदयविकारासह गंभीर आजार चालकाला आहेत का, याविषयीही तपासणी केली जाणार आहे. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत आदेश दिले आहेत.
एसटीच्या चालकांवर कामाचा प्रचंड ताण असून त्यांना १० ते १३-१४ तास काम करावे लागते. मार्गावरील धाववेळ लक्षात न घेता कागदावर धाववेळ कमी दाखवून चालकांकडून जास्त काम करून घेतले जाते. त्या कामाचा मोबदलाही दिला जात नाही. त्यांना दर आठवडय़ाला दोन-तीन दिवस परगावी रहावे लागते. वरिष्ठांकडून अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता चांगली कशी राहणार, असा सवाल संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

solapur pune pravasi sangatana