रावेरजवळ पूल खचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

09/08/2011 16:17

अकोला, बडनेरा, नागपूर, इटारसी मार्गाने वाहतूक वळवली
भुसावळ, २९ जुलै
भुसावळ-दिल्ली लोहमार्गावरील रावेर ते वाघोडा रेल्वे स्थानकादरम्यान खचलेल्या रेल्वे पुलाच्या दुरूस्तीचे कार्य प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. यामुळे उत्तर भारताशी जोडणाऱ्या सर्व रेल्वेगाडय़ा अकोला, बडनेरा, नागपूर व इटारसीमार्गे वळविण्यात आल्या आहेत तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत एकेरी मार्ग सुरू होणे अपेक्षित आहे.
खचलेला रेल्वे पूल बराच जुना असल्याने सुमारे अडीचशे कामगारांच्या मदतीने अहोरात्र दुरूस्तीचे काम केले जात आहे. हुजूरसाहेब नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस गेल्यानंतर हा पूल खचल्याचे लक्षात आले होते. याची माहिती चालकाने रावेर व बऱ्हाणपूर रेल्वेस्थानक प्रबंधकांना दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाजवळील जमीन खचल्याने पूल जमिनीत धसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने भुसावळहून उत्तरेत जाणाऱ्या सर्व रेल्वे गाडय़ा विविध स्थानकांवर रोखल्या. पवन एक्स्प्रेस, एलटीटी कामायनी एक्स्प्रेस, रावेर स्थानकात थांबविण्यात आल्या. प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत देऊन त्यांना बसद्वारे खंडवा व बऱ्हाणपूरकडे रवाना केले. त्यानंतर पुणे-जम्मुतावी झेलम एक्स्प्रेस, पुणे-पटणा एक्स्प्रेस, निझामुद्दीन-छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस राजेंद्रनगर जनता एक्स्प्रेस, मुंबई-पटणा राजेंद्रनगर सुपरफास्ट एक्स्प्रेस आदी गाडय़ांच्या मार्गात बदल करून त्या नागपूरमार्गे वळविण्यात आल्या होत्या. एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस, सूरत-वाराणसी ताप्तीगंगा, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, गुवाहाटी, मुंबई-लखनऊ एक्स्प्रेस या गाडय़ा रतलाल, नागदा, उज्जन, भोपाळ झांसीमार्गे वळविल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. ३० जुलै रोजी सुटणाऱ्या नागपूर-मुंबई विशेष गाडी, बल्लाहशाह-वर्धा सवारी, वर्धा-भुसावळ सवारी या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या व जाणाऱ्या लष्कर, जबलपूर-मुंबई गरीबरथ, हबीबगंज एलटीटी, पवन एक्स्प्रेस, वाराणसी एलटीटी कामायनी या गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत.    


solapur pune pravasi sangatana