रेल्वे स्थानकांबाहेर आता प्रीपेड टॅक्सी सेवा

14/05/2011 14:29

मुंबई, १२ मे / प्रतिनिधी
मध्य रेल्वेवरील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल व वांद्रे टर्मिनस या तीन स्थानकांबाहेर लवकरच प्रीपेड टॅक्सी सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांनी मुंबईत पोहोचणाऱ्या प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेश कुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील तिन्ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी (आरटीओ) आपापल्या हद्दीतील एकेका रेल्वे स्थानकाबाहेर प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्याचे या बैठकीत ठरले आहे. त्यानुसार ताडदेव आरटीओ मुंबई सेंट्रल, वडाळा आरटीओ लोकमान्य टिळक टर्मिनस आणि अंधेरी ‘आरटीओ’ वांद्रे टर्मिनस स्थानकाबाहेर लवकरच प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात तीन स्थानकांबाहेर प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी सांगितले. आजच्या बैठकीत या प्रीपेड टॅक्सी सेवेचे भाडेदरसुद्धा निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार जवळच्या अंतरासाठी टॅक्सी चालकांना ४० टक्के बोनस तर दूरच्या अंतरासाठी त्यांना २० टक्के बोनस मिळणार आहे. हे दर निश्चित करताना टॅक्सी चालकांचे हितदेखील लक्षात घेण्यात आल्याचे ‘आरटीओ’तील सूत्रांनी स्पष्ट केले.
टॅक्सी चालकांतर्फे जवळचे भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे, जादा भाडे आकारणे, मीटर जलद करणे यांसारखे प्रकार रेल्वे स्थानकांबाहेर नित्याचेच झाले आहेत. त्यामुळे टॅक्सी चालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी प्रीपेड टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी प्रदीर्घ काळापासून केली जात होती. ही सेवा सुरू करण्यासाठी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून रेल्वे आणि ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून त्यासाठी प्रत्येक स्थानकाबाहेर जागादेखील निश्चित करण्यात आली आहे, असे ‘आरटीओ’तील सूत्रांनी सांगितले.


solapur pune pravasi sangatana