रेल्वेचे भाडे वाढणार?

05/03/2012 10:58
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - रेल्वेचे उत्पन्न घसरत असल्याचे कारण पुढे करत वातानुकूलित श्रेणी प्रवासाच्या भाड्यात 10 ते 12 टक्के वाढ करण्याचे सूतोवाच केंद्रीय वित्त विभागाकडून मिळत आहेत.

गेली आठ वर्षे रेल्वेने प्रवासी भाड्यात वाढ केलेली नाही. मात्र आता रेल्वेचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने केंद्रीय वित्त विभाग आणि नियोजन मंडळाच्या सूचनेनुसार एसी प्रवास भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव रेल्वे महामंडळ तयार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही दरवाढ 10 ते 12 टक्के, म्हणजेच प्रति 500 किलोमीटरच्या टप्प्याला 35 रुपये असू शकते, असेही रेल्वे विभागातील सूत्रांकडून समजते. तर रेल्वेचे प्रवासीभाडे हे इंधन दरवाढीनुसार करण्याचा विचारही सुरू असल्याचे समजते. तसेच पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी प्रवासी, तसेच माल वाहतुकीसाठी अधिभार लावण्याचेही संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.

गत महिन्यात केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनीही अशा प्रकारच्या भाववाढीचे संकेत दिले होते. वित्त विभागाकडून सहकार्य मिळत नाही. अशातच खर्च वाढत आहे. या स्थितीत रेल्वे विभागानेच आता उत्पन्न वाढवण्याचे उपाय योजायला हवेत, असे ते म्हणाले होते. सध्या रेल्वे विभागास प्रवासी भाड्यापोटी दरवर्षी 16 हजार कोटी रुपयांचे अनुदान केंद्र सरकार देत आहे.

solapur pune pravasi sangatana