सोलापूर हायवेचे रुंदीकरण रखडले

08/11/2011 17:53
मृत्यूचा सापळा अशी ओळख असणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर दररोज होणाऱ्या अपघाताची संख्या तीन ते चारच्या आसपास आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामामुळे अपघातात भर पडत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे मात्र, सरकारी यंत्रणा या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहात नसल्याचे समोर आले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पुणे-सोलापूर महामार्गाच्या रूंदीकरणाचे सुरू असणारे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्तावर किरकोळ आणि गंभीर स्वरुपाचे किमान तीन ते चार अपघात होत असतात. रूंदीकरणाचे काम रखडल्यामुळे त्यात सातत्याने भर पडत आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम करणारा कंत्राटदार वेळापत्रकानुसार काम करतो आहे का, याकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

या रस्त्यावरील नदीवर नवीन पूल उभारण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पुलाचे काम तात्काळ पूर्ण व्हावे, म्हणून महामार्ग पोलिसांनी तब्बल दहा वेळा संबधित विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी या पुलाचे काम राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग करत असल्याचे उत्तर मिळाले, त्यानंतर त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला. तेव्हा पुढील दोन महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे उत्तर महामार्ग पोेलिसांना देण्यात आले आहे. सध्या अरुंद पुलामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळावी, म्हणून पोलिसांना ९५० अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्यात देण्यात येणाऱ्या २५० अॅम्ब्युलन्सपैकी काही गाड्या महामार्ग पोेलिसांना उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

solapur pune pravasi sangatana