मुंबई इंडियन्स पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान * पुणे वॉरियर्सवर २१ धावांनी दणदणीत विजय * मलिंगाचे २५ धावांत ३ बळी

नवी मुंबई, ४ मे
सौरव गांगुलीच्या आगमनाची चाहूलही पुणे वॉरियर्सचे नशीब पालटवू शकली नाही. दोन विजयांसह झोकात आयपीएल ट्वेन्टी-२० स्पध्रेत प्रारंभ करणाऱ्या पुणे वॉरियर्सला ओळीने सातव्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गुणतालिकेत तळाला असलेल्या पुणे वॉरियर्सला आता आव्हान टिकविण्यासाठी उर्वरित पाचही सामने जिंकणे आणि दैवावर विश्वास ठेवणे इतकेच हाती उरले आहे. आता उरलेल्या आव्हानात्मक प्रवासात दादा त्यांच्यासोबत असेल हाच तो दिलासा. पण डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सचिनच्या मुंबई इंडियन्सने मात्र कमाल केली आणि २१ धावांनी शानदार विजय मिळविला. सातव्या विजयासह मुंबईने १४ गुणांनिशी अव्वल स्थानावर पुन्हा दिमाखात कब्जा केला आहे. लसिथ मलिंगाने २५ धावांत ३ विकेटस् घेत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. फक्त सात धावांमध्ये दोन विकेट्स पटकाविणाऱ्या पुण्याच्या राहुल शर्माला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.हरभजनने पहिल्याच चेंडूवर जेस्सी रायडरला बाद करून पुण्याच्या डावाला सुरूंग लावला. मग ग्रॅमी स्मिथला मुनाफ पटेलने फार काळ टिकू दिले नाही. ३ बाद ४६ अशा खराब सुरुवातीनंतर युवराज सिंग आणि मनीष पांडय़ेने चौथ्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण लसिथ मलिंगाने टाकलेल्या एका अप्रतिम चेंडूवर युवराज सिंगने अखेरच्या क्षणी मारलेला फटका थर्ड मॅनला मुनाफ पटेलने खुबीने झेलला आणि ही जोडी फुटली. मग मनीष पांडय़े आणि रॉबिन उथप्पा यांनी पाचव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली. पण मलिंगाने १९व्या षटकात पांडय़े आणि मिथुन मन्हासच्या विकेटस् काढत पुण्याच्या आव्हानाची हवाच काढली. मनीष पांडय़ेने ४७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारासह ५९ धावा काढून झुंजार प्रयत्न केले. रॉबिन उथप्पाने नाबाद ३४ धावा केल्या.
तत्पूर्वी, सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडू यांनी मुंबई इंडियन्सच्या नित्यप्रथेप्रमाणे दुसऱ्या विकेटसाठी उभारलेली ४० धावांची भागीदारी याशिवाय तिरुमलासेट्टी सुमन आणि किरॉन पोलार्ड यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ बाद १६० धावा केल्या.मुंबईची सुरुवात नेहमीप्रमाणेच खराब झाली. अ‍ॅन्ड्रय़ू बिझार्ड फक्त सहा धावा काढून माघारी परतल्यावर सचिन आणि रायडूने नित्यप्रथेप्रमाणे मुंबईचा डाव सावरला. मग युवराज सिंगने सचिन (२४) आणि रायडू (२७) हे अडसर दूर केले. त्यानंतर आलेल्या टी. सुमनने अनपेक्षितपणे झोकात फलंदाजी केली. फक्त १६ चेंडूंत त्याने ३ चौकार आणि ३ षटकारासह ३६ धावा केल्या. राहुल शर्माने सुमनचा अडसर दूर केला. पण मुंबईचा धावफलक धीम्यागतीने चालला होता. अल्फान्सो थॉमसचे १९वे षटक मुंबईच्या दृष्टीने किफायतशीर ठरले. या षटकात किरॉन पोलार्डने हरभजनच्या साथीने तब्बल २८ धावा चोपून काढल्या. या षटकात पोलार्डने थॉमसला लाँग ऑनला दोन लाजवाब षटकार ठोकले. शेवटच्या हाणामारीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पोलार्ड ३० धावांवर बाद झाला. त्या त्याने १६ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारासह काढल्या होत्या. जेरॉम टेलर, युवराज सिंग आणि राहुल शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या. तर मनीष पांडय़ेने तीन अप्रतिम झेल टिपले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स :
२० षटकांत ७ बाद १६० (सचिन तेंडुलकर २४, अंबाती रायडू २७, टी. सुमन ३६, किरॉन पोलार्ड ३०; जेरॉम टेलर २/३४, युवराज सिंग २/२२, राहुल शर्मा २/७) विजयी वि. पुणे वॉरियर्स : २० षटकांत ७ बाद १३९ (मनीष पांडय़े ५९, युवराज सिंग २०, रॉबिन उथप्पा नाबाद ३४; लसिथ मलिंगा ३/२५).  सामनावीर -: राहुल शर्मा


solapur pune pravasi sangatana