गेलच्या तुफानाने राजस्थान खल्लास! बंगळुरूचा शानदार विजय * एस. अरविंद सामनावीर

जयपूर, ११ मे/वृत्तसंस्था
वादळी फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आणखी एक अ‘द्वितीय’ विजय मिळवून दिला. गेलच्या ७० धावांच्या खेळीमुळे बंगळुरूने राजस्थानचा ९ विकेटस् आणि १८ चेंडू राखून पराभव करीत आयपीएल क्रिकेट स्पध्रेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. बंगळुरूच्या खात्यावर आता ११ सामन्यांत १५ गुण जमा आहेत. ३४ धावांत ३ बळी घेऊन बंगळुरूच्या विजयाचा पाया रचणाऱ्या एस. अरविंदला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
गेल आणि दिलशान यांनी ६.४ षटकांत ६८ धावांची भागीदारी रचली. शेन वॉर्नने दिलशानला ३८ धावांवर बाद करून ही जोडी फोडली. मग गेल आणि
विराट कोहलीने  दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी करून बंगळुरूला जिंकून दिले. गेलने आपला वादळी अविर्भाव बुधवारीही कायम राखताना फक्त ४४ चेंडूंत ६ चौकार आणि चार षटकारासह ७० धावा केल्या.
त्याआधी, दमदार सलामीमुळे राजस्थानला २० षटकांत ६ बाद १४६ अशी धवसंख्या उभारता आली. सलामीवीर राहुल द्रविडने सर्वाधिक ३१ चेंडूंत ३७ धावा केल्या आणि त्याचा सहकारी शेन वॉटसनने २९ चेंडूंत ३४ धावा केल्या.
द्रविड आणि वॉटसन जोडीने ७३ धावांची महत्त्वपूर्ण सलामी नोंदविली. मात्र बंगळुरूचा डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीनाथने १०व्या षटकात दोन्ही सलामीवीरांना तंबूची वाट दाखवली. या धक्क्यातून राजस्थानची मधली फळी नीट सावरू शकली नाही. रॉस टेलरने (१३) पुन्हा निराश केली. अरविंदने ३४ धावांत ३ विकेटस् घेतल्या.डॅनियल व्हेटोरीच्या अनुपस्थितीत २२ वर्षीय विराट कोहलीकडे बंगळुरूच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. आयपीएलमधील सर्वात तरुण कर्णधाराचा मान कोहलीने मिळविला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ६ बाद १४६ (शेन वॉटसन ३४, राहुल द्रविड ३७; एस. अरविंद ३/३४) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १७ षटकांत १ बाद १५१ (ख्रिस गेल नाबाद ७०, तिलकरत्ने दिलशान ३८, विराट कोहली नाबाद ३९)  


solapur pune pravasi sangatana