अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सची बाजी रायडूचा षटकार कोलकाताच्या जिव्हारी जेम्स फ्रॅन्कलिनने विजयश्री खेचून आणली

फ्रॅन्कलिन-रायडूची शेवटच्या षटकात २३ धावांची वसुली
शेवटच्या षटकांत २१ धावांचे अवघड आव्हान उभे ठाकले असताना जेम्स फ्रॅन्कलिन व अंबाती रायडू यांनी लक्ष्मीपती बालाजीच्या गोलंदाजीची पिसे काढत २३ धावा चोपल्या. त्यामुळेच मुंबई इंडियन्सने कोलकाता संघावर पाच विकेट राखून विजय मिळविला आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील साखळी गटात तिसरे स्थान घेतले. कोलकाता संघास साखळी गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ईडन गार्डन्सवर ६० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या लढतीत मुंबईची १९ षटकांअखेर ५ बाद १५५ अशी स्थिती होती, त्यावेळी मुंबईचा विजय होईल असे वाटतही नव्हते. तथापि २० व्या षटकांत बालाजीच्या खराब गोलंदाजीवर प्रथम फ्रॅन्कलिनने सलग चार चौकार मारले. पाचव्या चेंडूवर त्याने एक धाव मिळविली. सहाव्या चेंडूवर रायडूने उत्तुंग षटकार खेचून प्रेक्षकांना जावेद मियाँदादने चेतन शर्मास शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराची आठवण करुन दिली. मुंबईने सलामीवीर तिरुमलाईसेती सुमन (४) याची विकेट लवकर गमावली. मात्र तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हरभजनसिंगने आक्रमक खेळ करीत ३० धावा केल्या. पाच चौकार मारणाऱ्या हरभजनने सचिन तेंडुलकरच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी षटकामागे नऊ धावांचा वेग ठेवीत ५७ धावांची भागीदारी केली. तथापि ही जोडी फुटल्यावर पुन्हा मुंबईच्या धावांचा वेग कमी झाला. त्यातच त्यांनी रोहित शर्मा (१०) व त्यापाठोपाठ सचिनचीही विकेट गमावली. सचिनने सहा चौकारांसह ३८ धावा केल्या. त्यानंतर फ्रॅन्कलिन याने एक षटकार व ५ चौकारांसह नाबाद ४५ धावा केल्या. कोलकाता संघाकडून रजत भाटिया याने २२ धावांमध्ये तीन बळी घेतले.
कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १७५ धावा केल्या. जॅक कॅलिस याने सर्वाधिक ५९ धावा केल्या. श्रीवत्स गोस्वामी (१) व कर्णधार गौतम गंभीर (८) हे झटपट बाद झाल्यानंतर कॅलिसने मनोज तिवारी याच्या साथीत ४५ धावा व युसूफ पठाण याच्या साथीत ५७ धावांची भागीदारी केली. त्यामुळेच कोलकाता संघास आश्वासक धावसंख्या रचता आली. कॅलिसने ४२ चेंडूत चार चौकार व तीन षटकार अशी आतषबाजी केली. तिवारी याने २२ चेंडूंत पाच चौकार व एक षटकारासह ३५ धावा केल्या. मोठय़ा खेळीची अपेक्षा असणाऱ्या युसूफने २७ चेंडूंत ३६ धावा केल्या. त्यामध्ये त्याने एक षटकार व चार चौकार अशी फटकेबाजी केली. रियान टेन डोईत्स्चॅट याने एक चौकार व एक षटकारासह १८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ७ बाद १७५ (जॅक कॅलिस ५९, मनोज तिवारी ३५, युसुफ पठाण ३६, अबू अहंमद २/३२, जेम्स फ्रॅन्कलिन २/३५) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद १७८ (हरभजन सिंग ३०, सचिन तेंडुलकर ३८, किरॉन पोलार्ड १८,जेम्स फ्रॅन्कलिन नाबाद ४५, अंबाती रायडू नाबाद १७,रजत भाटिया ३/२२) 


solapur pune pravasi sangatana