आता गाठ बंगळरुशी मुंबईचा कोलकातावर चार विकेट्सने विजय

मुंबई, २५ मे
जितेंगे तो और भी लढेंगे.. अशा आवेशात कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अटीतटीचा सामना झाला. २४ चेंडू २५, १८ चेंडू १८, १२ चेंडू १५ आणि ६ चेंडू ७ धावा अशा दोलायमान अवस्थेत सामना होता. कोण जिंकेल आणि बंगळुरुशी भिडायला जाईल, हे भाकीत कोणीही करत नव्हते. कारण दोन्हीही संघ तुल्यबळ असेच होते. प्रत्येक चेंडूगणिक समीकरणे बदलत होती. अखेरच्या षटकात सात धावा हव्या असताना खेळपट्टीवर जम बसलेल्या जेम्स फ्रँकलिनने एक धाव काढली. स्ट्राइकला आला हरभजन सिंग. आता हा सिंग काय करणार, कोणला काहीही मागमूस नव्हता. पण त्याने कसलाही विचार न करता शाकिब-अल-हसनच्या दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम षटकार ठोकत साऱ्या गोष्टींना पूर्णविराम देत मुंबईला चार विकेट्सनी सामना जिंकवून दिला. मुनाफ पटेलच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकाताला प्रथम फलंदाजी करताना १४७ धावा करता आल्या होत्या. मुंबईने हे आव्हान चार विकेट्स राखत पूर्ण केले. आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मुंबईला बंगळुरुशी दोन हात करावे लागणार आहेत. २७ धावांत तीन विकेट्स मिळविणाऱ्या मुनाफ पटेलला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
कोलकाताच्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने झोकात सुरुवात केली. प्रत्येक षटकात १० धावांची सरासरी ठेवायची हे मुंबईचा कर्णधार सचिन तेंडुलकर आणि एडन ब्लिझार्ड या सलामीवीरांनी मनाशी पक्के केले होते आणि तसाच खेळ त्यांनी केला. पाचव्या षटकात सचिनने युसूफ पठाणला खणखणीत चार चौकार ठोकत संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. यानंतर ब्लिझार्ड अधिकच आक्रमक झाला. या दोघांनी ८१ धावांची सलामी दिली, ज्यामध्ये ब्लिझार्डचा वाटा होता ५१ धावांचा. त्याने ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतकी खेळी साकारली. ब्लिझार्ड बाद झाल्यावर रोहित शर्मा (०)  एकही चेंडू न खेळता धावबाद झाला. दोन विकेट्स पडल्या असल्या तरी सचिन आपल्या पद्धतीने समाचार घेत होता. दहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने कॅलिसला सुरेख चौकार खेचला. पण याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर कॅलिसचा आखूड चेंडू पूल करण्याच्या नादात सचिन ‘बॅकवर्ड पॉइंट’ला मनोज तिवारीकरवी झेलबाद झााला आणि मुंबईचा संघ टेन्शनमध्ये आला. बाद होण्यापूर्वी सचिनने २८ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ३६ धावा फटकाविल्या. त्यानंतरच्याच षटकात कॅलिसने अंबाती रायडूला (१२) बाद करत मुंबईचे कंबरडे मोडले. त्यानंतर किरॉन पोलार्डही (३) झटपट बाद झाला आणि मुंबईवरचे दडपण अधिकच वाढले. पण गेल्या सामन्यात मुंबईला अनपेक्षित विजय मिळवून देणारा जेम्स फ्रँकलिन (नाबाद २९) खेळपट्टीवर होता. त्याने मग हरभजनला (नाबाद ११) साथीला घेत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून कोलकाताला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. मुनाफ पटेल, धवल कुलकर्णी आणि हरभजन सिंग यांनी सुरुवातीला भेदक मारा करत कोलकाताची ४ बाद २० अशी दयनीय अवस्था केली. हरभजनने पहिल्याच षटकात कर्णधार गौतम गंभीरचा (४) त्रिफळा उद्ध्वस्त केला. तर जॅक कॅलिस (७) आणि मनोज तिवारी (४) हे फार्मात असलेले फलंदाजही स्वस्तात तंबूत पाठवले. कोलकाताचे वस्त्रहरण होत असताना त्यांच्यासाठी कृष्णासारखा धावून आला तो रियान टेन डोईश्चेट. त्याने युसूफ पठाणबरोबर (२६) पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून दिले. ही जोडी मोठी धावसंख्या कोलकाताला उभारून देईल असे वाटत असतानाच मुनाफने युसूफचा काटा दूर केला. युसूफला आज लौकिकाला साजेशी पठाणी वसूली करता आली नाही. पठाण बाद झाला असला तरी रियान टेन डोईश्चेटने एका बाजूने खंबीरपणे खिंड लढवली. त्याने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या आणि त्याच्या या चमकदार कामगिरीच्या जोरावर कोलकाताला १४७ धावा करता आल्या. मुनाफ पटेलने यावेळी भेदक मारा करत २७ धावांत ३ मोहरे टिपले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ७ बाद १४७ (रियान टेन डोईश्चेट नाबाद ७०, शाकिब-अल-हसन २६, मुनाफ पटेल २७ धावांत ३ बळी) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.४ षटकांत ६ बाद १४८ (ऐडन ब्लिझार्ड ५१, सचिन तेंडुलकर ३६, जॅक कॅलिस १८ धावांत २ बळी) सामनावीर : मुनाफ पटेल. 


solapur pune pravasi sangatana