आनंदचे "सुपरफास्ट' विजेतेपद!

लिऑन - भारताच्या विश्‍वविजेत्या विश्‍वनाथन आनंद याने जलद बुद्धिबळामधील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. लिऑन स्पर्धेत त्याने स्पेनचा आव्हानवीर ऍलेक्‍सी शिरॉव याचे आव्हान लीलया मोडून काढले. आनंदने सहा डावांच्या लढतीत तीन गुणांच्या फरकाने दणदणीत विजय मिळविला.
आनंदने कारकिर्दीत आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली. तीन दिवस ही स्पर्धा चालली. आनंदने एक डाव जिंकला, तर इतर सर्व डाव बरोबरी सोडविले. त्याने एकही डाव गमावला नाही. प्रत्येक डाव निर्धारित 45 मिनिटांचा होता. त्यानंतर चालिगणीक अर्ध्या सेकंद वेळेची भर पडत होती.

जेतेपद निश्‍चित करण्यासाठी रविवारी आनंदला फक्त एका बरोबरीची गरज होती. दोन्ही डाव चुरशीने झाले. पाचव्या डावात आनंदने 41 चालींत विजय मिळविला. यामुळे त्याला विजयी आघाडी मिळाली. सहाव्या डावात शिरॉवने थोडीफार प्रतिष्ठा कमावण्याच्या निर्धाराने झुंजार खेळ केला. यानंतरही आनंदने त्याला संधी दिली नाही. पांढऱ्या मोहऱ्यांसह त्याने 39 चालींमध्ये बरोबरी साधली.

आनंदने तिसरा डाव 17 चालींत जिंकला. शिरॉवने राजाला यशस्वी शह बसणे अटळ असल्याचे लक्षात येताच पराभव मान्य केला. आनंदने यापूर्वी इंग्लंडचा ग्रॅंडमास्टर नायजेल शॉर्ट याला 2002च्या फिडे ग्रांप्री स्पर्धेत 17 चालींत हरविले होते. ग्रॅंडमास्टरवर आनंदने मिळविलेले हे सर्वाधिक वेगवान विजय आहेत. शॉर्टविरुद्ध आनंदकडे काळी मोहरी होती.

आनंदने याआधी 1996, 1999, 2000, 2001, 2005, 2006 व 2007 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
निकाल - विश्‍वनाथन आनंद वि.वि. ऍलेक्‍सी शिरॉव 4.5-1.5
पहिला डाव - शिरॉव बरोबरी वि. आनंद. दुसरा - आनंद वि.वि. शिरॉव. तिसरा - शिरॉव पराभूत वि. आनंद. चौथा - आनंद बरोबरी वि. शिरॉव. पाचवा - शिरॉव पराभूत वि. आनंद. सहावा - आनंद बरोबरी वि. शिरॉव.


solapur pune pravasi sangatana