आयसीसीवर बीसीसीआयचेच वर्चस्व

मेलबर्न - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वर्चस्व असल्याचे मत जवळपास दोन तृतीयांशाहून अधिक क्रिकेटपटूंनी व्यक्त केले. तसेच जवळपास 40 टक्के क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळण्यासाठी राष्ट्रीय संघातून माघार घेण्याचीही तयारी दर्शविली असल्याची धक्कादायक माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या महासंघाने (फिका) केलेल्या सर्वेक्षणामधून स्पष्ट झाली आहे. या संघटनेमध्ये भारत, पाकिस्तान आणि झिंबाब्वे या देशांतील एकही खेळाडू नाही.

प्रथम टोनी ग्रेग आणि नंतर श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा यांनी बीसीसीआयच्या आर्थिक ताकदीवर टीकास्त्र सोडले होते. पाठोपाठ आता "फिका'च्या सर्वेक्षणामध्येही बहुतांश खेळाडूंची हीच भावना असल्याचे समोर आले आहे. आयसीसीच्या निर्णयांवर बीसीसीआयचा वरचष्मा असल्याचे 69 टक्के खेळाडूंना वाटते. विशेष म्हणजे, ही प्रश्‍नावली भरून देणाऱ्या एकाही खेळाडूने "बीसीसीआयचा वरचष्मा आहे का' या प्रश्‍नाला नकारार्थी उत्तर दिलेले नाही. या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करताना "फिका'चे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम मे म्हणाले, ""या निष्कर्षांमधून महत्त्वाचे प्रश्‍न समोर आले आहेत. जवळपास 46 टक्के खेळाडूंनी आयसीसीची रचना आणि कार्यपद्धती बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. यामुळे नि:पक्षपाती आणि स्वच्छ प्रशासन ही क्रिकेटची गरज असण्यावर खेळाडूंनी प्रकाशझोत टाकला आहे. कारण सध्याचे आयसीसीचे स्वरूप हे वादग्रस्त आहे.'' आयसीसीने घेतलेले निर्णय हे क्रिकेटच्या हिताचेच असतात, असे केवळ सहा टक्के खेळाडूंना वाटते.

विशेष म्हणजे, बीसीसीआयच्या कारभारावर टीका करणाऱ्या खेळाडूंपैकी अनेकांनी आयपीएलसाठी राष्ट्रीय संघातूनही माघार घेण्याची तयारी दर्शविली. राष्ट्रीय संघांच्या कार्यक्रमादरम्यानच आयपीएलचे सामने आल्याने अनेक खेळाडूंना दोघांपैकी एकावर पाणी सोडावे लागले आहे. यामुळे "देश की क्‍लब' असा नवा वादही निर्माण होत आहे. आयपीएलमध्ये केवळ सात आठवड्यांसाठी मिळणाऱ्या भरघोस मानधनामुळे भविष्यामध्ये आपापल्या क्रिकेट मंडळांपेक्षा आयपीएलला महत्त्वाचे स्थान मिळेल, असे मत जवळपास 40 टक्के खेळाडूंनी व्यक्त केले. आयपीएलमध्ये मिळणाऱ्या मानधनामुळे युवा खेळाडू देशापेक्षा क्‍लबला प्राधान्य देऊ शकतात, अशी भीती तब्बल 94 टक्के खेळाडूंनी व्यक्त केली. टीम मे म्हणाले, ""भरघोस मानधनामुळे येत्या काळामध्ये आयपीएलदरम्यान आंतरराष्ट्रीय दौरे आयोजित करण्यासाठी क्रिकेट मंडळांना कसरत करावी लागणार आहे.''

"स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरणात दोषी आढळलेल्या सलमान बट्ट, महंमद आमीर आणि महंमद आसीफवर लादण्यात आलेली बंदी खूपच सौम्य असल्याचे मत तब्बल 77 टक्के खेळाडूंनी व्यक्त केले. ""अशा गुन्ह्यांसाठी अधिक कठोर शिक्षा असाव्यात, असेच बहुतांश खेळाडूंचे मत आहे,'' असे मे यांनी सांगितले.

"रेफरल सिस्टीम'ला पाठिंबा
"फिका'च्या या सर्वेक्षणामध्ये वादग्रस्त "रेफरल सिस्टीमला पाठिंबा देण्यात आला आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये "रेफरल सिस्टीम'चा वापर अनिवार्य करण्याची मागणी तब्बल 97 टक्के खेळाडूंनी केली. उपखंडामध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये "रेफरल सिस्टीम'मुळे अचूक निर्णय देण्यात मदत झाल्याचे 82 टक्के खेळाडूंनी नमूद केले. मात्र ही स्पर्धा खूपच लांबल्याचे मत 74 टक्के खेळाडूंनी व्यक्त केले. पण त्याच वेळी ही स्पर्धा उत्तम झाल्याचे 94 टक्‍क्‍यांहून अधिक खेळाडूंनी सांगितले.


solapur pune pravasi sangatana