इशांतपुढे कोची शांत ; डेक्कन चार्ज ५५ धावांनी विजय

कोची, २७ एप्रिल
क्रिकेट आणि त्यामध्ये ट्वेन्टी-२० हा गोलंदाजांचाही खेळ आहे, हे इशांत शर्माने दाखवून दिले. इशांतने आपल्या पहिल्या दोन षटकांमध्ये कोचीच्या पाच फलंदाजांना बाद केल्याने त्यांची ६ बाद ११ अशी दयनीय अवस्था झाली होती, तिथून सामना जिंकणे जवळपास अशक्य वाटत होते आणि तसेच झाले.इशांतपुढे कोचीच्या फलंदाजांना लोटांगण घालावे लागले.अवर्णनिय गोलंदाजीच्या जोरावर डेक्कन चार्जर्सने कोची टस्र्कर्स केरळचा ७४ धावांमध्येच खुर्दा उडवून सहजपणे सामना जिंकला. इशांतच्या भेदक आणि अचूक माऱ्यापुढे कोचीचा संघ शांत झाला आणि डेक्कन चार्ज. डेक्कनचा कर्णधार कुमार संगकाराने कर्णधाराला साजेशी अर्धशतकी खेळी साकारल्यामुळे संघाला १३० धावा करता आल्या. इशांतचा तिखट मारा आणि त्याला डेल स्टेनची मिळालेली सुयोग्य साथ यामुळे डेक्कनने कोचीवर ५५ धावांनी सहज विजय संपादन केला.
१३० धावांचे आव्हान ट्वेन्टी-२०मध्ये माफक वाटत असले तरी इशांतच्या अचूक माऱ्यापुढे कोचीला नतमस्तक व्हावे लागले. स्टेनने पहिल्याच षटकांत धोकादायक वाटत असलेल्या ब्रेन्डन मॅक्युलमला तंबूचा रस्ता दाखवला. तर इशांतने त्याच्या पहिल्या षटकात पार्थिव पटेल, गोम्झ आणि ब्रॅड हॉज यांना तंबूत धाडले. त्यानंतरच्या षटकात इशांतने केदार जाधव आणि कर्णधार महेला जयवर्धने यांना बाद करत कोचीची गोची केली. मुख्य म्हणजे हे जे सहा फलंदाज बाद झाले त्यांच्यामधल्या कर्णधार जयवर्धनेलाच फक्त चार धावा करता आल्या, अन्य फलंदाजांना यावेळी भोपळाही फोडता आला नाही. या धक्क्य़ातून कोचीला रवींद्र जडेजा (२३), थिसारा परोरा (२२) आणि विनयकुमार (१८) यांनी सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण सुरूवातीलाच भगदाड पडलेल्या कोचीच्या संघाला यावेळी त्यांनाही सावरता आले नाही आणि त्यांच्यावर पराभवाची नामुष्ची ओढवली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या डेक्कनची ३ बाद २० अशी अवस्था होती. पण कर्णधार संगकाराने १० चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ६५ धावांची खेळी साकारत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. संगकाराने यावेळी कॅमेरून व्हाइटसह (३१) चौथ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. पण हे दोघे बाद झाल्यावर डेक्कनचा संघ गडगडला आणि त्यांना २० षटकांत १३० धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक - डेक्कन चार्जर्स-: २० षटकांत ७ बाद १३० (कुमार संगकारा ६५, कॅमेरून व्हाइट ३१, विनयकुमार २५ धावांत ३ बळी) विजयी वि. कोची टस्कर्स केरळ -: १६.३ षटकांत सर्व बाद ७४ ( रवींद्र जडेजा २३, इशांत शर्मा १२ धावांत ५ बळी, डेल स्टेन १६ धावांत ३ बळी) सामनावीर-: इशांत शर्मा.


solapur pune pravasi sangatana