कर्स्टन दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक?

जोहान्सबर्ग - भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याकडे आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे निश्‍चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयी अधिकृत घोषणा येत्या सोमवारी करण्यात येण्याची शक्‍यता आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर गेले दोन महिने दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदासाठी शोधमोहीम सुरू होती. तसेच, सहायक प्रशिक्षक म्हणून माजी वेगवान गोलंदाज ऍलन डोनाल्ड यांची निवड करण्यात येणार आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कर्स्टन यांना प्रचंड यश मिळाले. कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक पटकाविण्यापासून विश्‍वकरंडक जिंकण्यापर्यंत कर्स्टन यांचा मोलाचा वाटा होता. विश्‍वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक कोरी वॅन झिल आता दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या (सीएसए) उच्च प्रशिक्षण केंद्राचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. मात्र, कर्स्टन यांच्या नियुक्तीविषयी सीएसएने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
भारताच्या प्रशिक्षकपदाच्या कराराची मुदत वाढविण्यासाठी कर्स्टन यांनी नकार दिला होता. कुटुंबासाठी अधिक वेळ देणे गरजेचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदी त्यांची निवड होणार असल्याची चर्चा सुरू होची. तसेच कसोटी, एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 क्रिकेटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक नेमून आपण मुख्य प्रशिक्षक किंवा संचालक म्हणून काम पाहण्याचा प्रस्ताव कर्स्टन यांनी सीएसएसमोर ठेवल्याचीही चर्चा होती; पण सीएसएने हा प्रस्ताव नाकारला. दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन यांच्यासमोर रिचर्ड पीबस यांचे आव्हान होते.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर डोनाल्ड यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान डोनाल्ड न्यूझीलंडचे गोलंदाजीचे प्रशिक्षक होते.

दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार केपलर वेसल्स यांनी कर्स्टन आणि डोनाल्ड यांच्या निवडीवर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ""कर्स्टन यांनी भारतीय संघाबरोबर मोठे यश मिळविले. आंतरराष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाकडून काय अपेक्षा असतात, याची कर्स्टन यांना जाणीव आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या संघाबरोबर काम करण्यासाठी डोनाल्ड अनेक दिवसांपासून उत्सुक होता. तो स्वत: दर्जेदार गोलंदाज होता आणि त्याच्याकडे प्रशिक्षणाचे उत्तम तंत्रही आहे. यामुळे या दोघांची निवड दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सर्वार्थाने योग्य ठरेल.''


solapur pune pravasi sangatana