किंग्ज इलेव्हन पंजाबचा मुंबईवर ७६ धावांनी धक्कादायक विजय

मोहाली, १० मे
गुणतालिकेतील तळाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने मंगळवारी कमाल केली आणि चक्क अव्वल स्थानावरील मुंबई इंडियन्सलाच पराभवाचा धक्का दिला. सचिन तेंडुलकर आणि एडन ब्लिझार्ड या मुंबईच्या आघाडीला प्रवीण कुमारने तंबूची वाट दाखविल्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज भार्गव भटने पराक्रम दाखविला आणि मुंबईच्या फलंदाजांनी सपशेल हाराकिरी पत्करली. फक्त १२.५ षटकांत मुंबईच्या डावाला पूर्णविराम मिळाल्यामुळे पंजाबने ७६ धावांनी दणदणीत विजय साजरा करताना आपले आव्हान अद्याप टिकवून ठेवले आहे.
मुंबईच्या फक्त चार फलंदाजांना दोन आकडय़ात धावा करता आल्या, त्यापैकी सर्वाधिक होत्या त्या किरॉन पोलार्डच्या १७. भटने ११व्या षटकात हरभजनचा त्रिफळा उडवित आपला पहिला बळी घेतला. मग भटचे १३वे षटक मुंबईसाठी कर्दनकाळ ठरले. त्याने अनुक्रमे दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे किरॉन पोलार्ड, धवल कुलकर्णी आणि मुनाफ पटेल यांचे बळी घेऊन मुंबईचा डाव संपविला. विजयानंतर स्टेडियममध्ये अभिनेत्री प्रीती झिंटासह तमाम पंजाबवासियांनी जल्लोष साजरा केला.
किंग्ज इलेव्हनचा संघ एका क्षणी २ बाद १२९ अशा दमदार स्थितीत होता. पण अखेरच्या पाच षटकांत होत्याचे नव्हते झाले. त्यांचे सहा फलंदाज अवघ्या ३९ धावांची भर घालून तंबूत परतले. ही किमया भारताचा वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलची. त्याने ४ षटकांत फक्त २१ धावांत पाच बळी घेऊन पंजाबची दाणादाण उडवून दिली. दुसरीकडून लसिथ मलिंगाने २४ धावांत २ बळी घेत त्याला छान साथ दिली. त्यामुळेच निर्धारित षटकांत मुंबईला पंजाबला ८ बाद १६३ धावांवर रोखता आले.
किंग्ज इलेव्हनकडून शॉन मार्शने सर्वाधिक (३४ चेंडूंत ४३) धावा केल्या. याशिवाय दिनेश कार्तिक (२४ चेंडूंत ३१ धावा), अ‍ॅडम गिलख्रिस्ट (२८) आणि पॉल व्हल्थाटी (१४) यांनी पंजाबच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. पंजाबच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी दोन आकडी धावा केल्या. परंतु मधल्या आणि तळाच्या फळीने हाराकिरी पत्करली.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब :
२० षटकांत ८ बाद १६३ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट २८, शॉन मार्श ४३, दिनेश कार्तिक ३१; लसिथ मलिंगा २/२४, मुनाफ पटेल ५/२१) विजयी वि. मुंबई इंडियन्स : १२.५ षटकांत सर्वबाद ८७ (एडन ब्लिझार्ड १५, किरॉन पोलार्ड १७; प्रवीण कुमार २/१९, भार्गव भट ४/२२); सामनावीर : भार्गव भट.  


solapur pune pravasi sangatana