कोची टस्कर्स सहा धावांनी विजयी

कोची टस्कर्स सहा धावांनी विजयी
कोलकाता, २० एप्रिल

चुरशीने खेळल्या गेलेल्या लढतीत कोची संघाने शिस्तबद्ध गोलंदाजी व अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आज आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सचा सहा धावांनी पराभव केला. १३३ धावांच्या आव्हानास सामोरे जाताना कोलकाताने २० षटकांत ९ बाद १२६ धावा केल्या.
कोलकाता संघाच्या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीपुढे कोची संघाचा डाव २० षटकांत ७ बाद १३२ धावांवर रोखला गेला.आक्रमक खेळाबाबत ख्यातनाम असलेल्या कोची संघाचा सलामीवीर ब्रॅन्डन मॅक्क्युलम याने नेहमीच्या शैलीने धडाकेबाज सुरुवात केली. त्याने माहेला जयवर्धने याच्या साथीत सलामीसाठी ४९ धावांचा पाया रचला, मात्र ही जोडी फुटल्यानंतर त्यांच्याकडून मोठी भागीदारी झाली नाही. मॅक्क्युलमने दोन चौकार व एक षटकारासह २३ धावा केल्या तर जयवर्धने याने तीन चौकारांसह २५ धावा केल्या. मधल्या फळीत रवींद्र जडेजाने आपल्या नावलौकिकास साजेसा खेळ करीत मैदान दणाणून सोडले. त्याने एक चौकार व तीन षटकारांसह २९ धावा केल्या. त्याचा अपवाद वगळता मधल्या फळीत फारसे कोणी चमक दाखवू शकले नाहीत. कोलकाता संघाकडून शकीब उल हसन व युसुफ पठाण यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
कोची संघाच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करीत प्रथमपासनूच कोलकाता संघाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून विजयासाठी आवश्यक असणारी मोठी भागीदारीच झाली नाही. आत्मविश्वासाने खेळ करणाऱ्या मनोज तिवारीचा अपवाद वगळता कोलकाताचा एकही फलंदाज फार वेळ टिकला नाही. तिवारीने दोन चौकार व दोन षटकारांसह ४६ धावा टोलविल्या. कोची संघाकडून रुद्रप्रतापसिंग व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
संक्षिप्त निकाल- कोची टस्कर्स केरळ : ७ बाद १३२ (ब्रॅन्डन मॅक्क्युलम २३, माहेला जयवर्धने २५, रवींद्र जडेजा २९, शकीब उल हसन ३/२८, युसुफ पठाण ३/२०) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स- २० षटकांत ९ बाद १२६ (मनोज तिवारी ४६, रुद्रप्रतापसिंग २/२५, रवींद्र जडेजा २/२५)

 


solapur pune pravasi sangatana