कोचीवर ३८ धावांनी मात; दिल्ली सातव्या स्थानावर

कोची, ३० एप्रिल
वीरेंद्र सेहवागने कर्णधाराला साजेशी अर्धशतकी खेळी साकारली आणि त्याच्या या खेळीच्या जोरावरच दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने कोची टस्कर्स केरळवर ३८ धावांनी सहज मात केली. पराभवाच्या छायेत असलेल्या दिल्लीच्या संघाला विजयाच्या वाटेवर परतले. सेहवागने आज संघाच्या धावसंख्येची सर्वस्वी जबाबदारी स्वत:वर घेत ८० धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच दिल्लीला २० षटकांत १५७ धावा करता आल्या. मॉर्केल, मव्‍‌र्ह, आगरकर आणि इरफान पठाण यांच्या अचूक गोलंदाजीपुढे कोचीचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. या विजयाने दिल्लीचा संघ सहा गुणांनिशी दहाव्या स्थानाहून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. तुफानी ८० धावांची खेळी साकारणाऱ्या सेहवागलाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
४७ चेंडूत आठ चौकार आणि ५ षटकारांची आतिषबाजी करत सेहवागने ८० धावा चोपून काढल्या आणि आमचे आव्हान अजूनही संपलेले नाही, हेच जणू सर्व संघांना आपल्या वादळी खेळीने सांगितले. दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळत नसली तरी सेहवाग चालतो, तेव्हा समोरच्या संघाचे काय होते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. कोचीचे संघ दिल्लीला ठराविक अंतरांनी धक्के देतच होता, पण सेहवागला मात्र त्यांना रोखता आले नाही.
१५८ धावांचे आव्हान फार मोठे वाटत नसले तरी मॉर्केल, मव्‍‌र्ह, आगरकर आणि इरफान पठाण यांनी भेदक मारा करत कोचीची गोची करत त्यांचे दहाही फलंदाज टिपले. रवींद्र जडेजा (३१) आणि ब्रॅड हॉज (२७) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअर डेव्हिल्स-: २० षटकांत ७ बाद १५७ (वीरेंद्र सेहवाग ८०,  एस. श्रीशांत १० धावांत २ बळी) विजयी वि. कोची टस्कर्स केरळ -: १८.५ षटकांत सर्व बाद ११९ (रवींद्र जडेजा ३१, मॉर्न मॉर्केल १८ धावांत ३ बळी, व्हॅन डर मव्‍‌र्ह २० धावांत ३ बळी). सामनावीर -: वीरेंद्र सेहवाग


solapur pune pravasi sangatana