कोलकाता अव्वल स्थानावर * डेक्कनवर २० धावांनी विजय

हैदराबाद, ३ मे
कोलकाता नाइट रायडर्सने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज करताना आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत डेक्कन चार्जर्सचा २० धावांनी पराभव केला. युसूफ पठाण व मनोज तिवारी यांनी केलेल्या ८० धावांच्या भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला हा महत्त्वपूर्ण विजय साकारता आला. धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या युसूफ पठाणनेच  सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले. शिखर धवलची झुंजार खेळी अपयशी ठरली.विजयासाठी १७० धावांच्या आव्हानास सामोरे जाताना डेक्कन चार्जर्सने २० षटकांत ६ बाद १४९ धावांपर्यंतच मजल गाठली. त्यांचा सलामीवीर शिखर धवन याने ४५ चेंडूंत एक षटकार व चार चौकारांसह ५४ धावा केल्या. त्याने सनी सोहल (२६) याच्या साथीत ४१ धावा, तर रवी तेजा याच्या साथीत ५६ धावांची भर घातली. तेजाने २२ चेंडूंत तीन चौकारांसह ३० धावा केल्या. रजत भाटिया आणि इक्बाल अब्दुल्ला यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.त्याआधी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने २० षटकांत ४ बाद १६९ धावा केल्या. त्याचे श्रेय मनोज तिवारी व युसुफ पठाण यांनी केलेल्या ८० धावांच्या भागीदारीस द्यावे लागेल. तिवारी याने तीन चौकार व एक षटकारासह ३३ धावा केल्या. युसुफ याने तीन जीवदानांचा फायदा घेत नाबाद ४७ धावा केल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार व तीन षटकार अशी फटकेबाजी केली. कोलकाताने या विजयामुळे ९ सामन्यांत १२ गुणांसह अव्वल स्थानावर मजल मारली आहे. तर डेक्कन चार्जर्स सहा गुणांसह सातव्या स्थानावर आहे.   
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स :
२० षटकांत ४ बाद १६९ (जॅक कॅलिस ३०, गौतम गंभीर ३५, मनोज तिवारी ३३, युसूफ पठाण नाबाद ४७, अमित मिश्रा १/२२) विजयी वि. डेक्कन चार्जर्स : २० षटकात ६ बाद १४९ (सनी सोहल २६, शिखर धवन ५४, डी.रवी तेजा ३०, रजत भाटिया २/२६, इक्बाल अब्दुल्ला २/३४)


solapur pune pravasi sangatana