कोलकाताचा अव्वल विजय

कोलकाता, ३० एप्रिल
इक्बाल अब्दुल्लाचा भेदक मारा आणि कर्णधार गौतम गंभीर व मनोज तिवारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ८५ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळेच कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज किंग्ज इलेव्हन पंजाबला आठ विकेट्स व १६ चेंडू राखून पराभूत केले.  या विजयामुळे कोलकाताच्या संघाने गुणतालिकेत मुंबई इंडियन्सला मागे टाकून अव्वल स्थान पटकाविले आहे. दोन विकेट्स पटकाविणाऱ्या इक्बालला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
विजयासाठी १२० धावांचे लक्ष्य कोलकाता संघाने १७.२ षटकांत व दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. त्याआधी कोलकाता संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबला २० षटकांत ६ बाद ११९ धावांवर रोखले. दिनेश कार्तिकने ४२ चेंडूंत ४२ धावा करीत पंजाबच्या धावसंख्येत महत्त्वाचा वाटा उचलला. कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टने तीन चौकार व एक षटकारासह २६ धावा केल्या. कोलकाताकडून इक्बाल अब्दुल्लाने १९ धावांमध्ये दोन बळी घेतले.
कोलकाताने जॅक कॅलिस (१) व इओन मोर्गन (२८) यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. पण त्यानंतर कर्णधार गौतम गंभीर व मनोज तिवारी यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघास विजय मिळवून दिला. गंभीरने ४४ चेंडूंमध्ये नाबाद ४५ धावा करताना चार चौकार मारले तर तिवारीने नाबाद ३४ धावांमध्ये तीन चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब-२० षटकांत ६ बाद ११९ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट २६, दिनेश कार्तिक ४२, इक्बाल अब्दुल्ला २/१९) पराभूत वि. कोलकाता नाईट रायडर्स-१७.२ षटकांत २ बाद १२० (इओन मोर्गन २८, गौतम गंभीर नाबाद ४५, मनोज तिवारी नाबाद ३४). सामनावीर -: इक्बाल अब्दुल्ला.


solapur pune pravasi sangatana