कोलकाताचा दिल्लीवर १७ धावांनी विजय

नवी दिल्ली, २८ एप्रिल
मनोज तिवारीच्या नाबाद अर्धशतकानंतर इक्बाल अब्दुल्लाच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली डेअरडेव्हिल्सला १७ धावांनी पराभूत केले. या विजयानिशी कोलकाताने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
त्यांच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले. त्यामुळेच निर्धारित षटकांत कोलकाता संघ ७ बाद १४८ धावांपर्यंतच मजल गाठू शकला. या स्पर्धेत सातत्याने फलंदाजी करणाऱ्या मनोज तिवारीचे नाबाद अर्धशतक हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. त्याने ४७ चेंडूंमध्ये नाबाद ६१ धावा करताना दोन चौकार व तीन षटकार अशी टोलेबाजी केली. श्रीवत्स गोस्वामी व कर्णधार गौतम गंभीर यांनीही कोलकाता संघाच्या धावसंख्येस हातभार लावला. गोस्वामीने चार चौकारांसह २२ धावा केल्या तर गंभीरने १८ धावा केल्या. विश्वचषक स्पर्धेत नेदरलँडकडून खेळणारा धडाकेबाज फलंदाज रियान टेन डोईश्चाटे याने दोन चौकार व एक षटकारासह १९ धावा केल्या. दिल्लीकडून उमेश यादवने २९ धावांमध्ये दोन बळी घेतले.
दिल्ली संघाकडून पहिल्या फळीत वीरेंद्र सेहवाग व जेम्स होप्स यांनी दमदार खेळ करुनही त्यांना अपेक्षेइतका धावांचा वेग ठेवता आला नाही. त्यातच त्यांची मधली फळी साफ कोलमडली. सेहवागने पाच चौकार व एक षटकारासह ३४ धावा केल्या तर होप्सने एक चौकार व एक षटकारासह २५ धावा केल्या. शेवटच्या फळीत वेणुगोपाळ राव व योगेश नागर यांनी प्रत्येकी १९ धावा केल्या तरीही त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. निर्धारित २० षटकांत दिल्लीस ९ बाद १३१ धावा करता आल्या.
संक्षिप्त निकाल
कोलकाता नाईट रायडर्स :
२० षटकांत ७ बाद १४८ (मनोज तिवारी नाबाद ६१, श्रीवत्स गोस्वामी २२, उमेश यादव २/२९, इरफान पठाण १/१६, जेम्स होप्स १/२५)
विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स :२० षटकांत ९ बाद १३१ (वीरेंद्र सेहवाग ३४, जेम्स होप्स २५, वेणुगोपाळ राव १९, योगेश नागर १९, इक्बाल अब्दुल्ला ३/२५, लक्ष्मीपती बालाजी २/३८).


solapur pune pravasi sangatana