कोलकाताचा ‘पठाणी’ हिसका!

सूफ पठाणची अष्टपैलू कामगिरी; गौतम गंभीरचे नाबाद अर्धशतक
पुणे वॉरियर्सवर सात विकेट्सने दणदणीत विजय
नवी मुंबई, १९ मे

कोलकात्याचा महाराजा सौरव गांगुलीच्याच साक्षीने कोलकाता नाइट रायडर्सने आपली वणवण संपल्याची ग्वाही दिली. आयपीएलच्या चौथ्या हंगामात सिनेअभिनेता शाहरूख खानच्या बाजूने नशिबाने कौल दिलाय. त्यामुळेच पुणे वॉरियर्सला त्यांच्या घरच्या मैदानावरील अखेरच्या सामन्यातही विजयाचे सुख कोलकाताने पदरी पडू दिले नाही. कोलकाताने ७ विकेटस् आणि २० चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला. याशिवाय १३ सामन्यांतील १६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर मजल मारताना झोकात प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. संघनायक गौतम गंभीरच्या ‘मिडासटच’मुळेच हे शक्य झाले आहे. आता कोलकाताची साखळीतील शेवटची लढत मुंबई इंडियन्सशी होणे बाकी आहे. तर मुंबईच्या दोन्ही लढती शिल्लक आहेत. त्यामुळे मुंबईने आपल्या दोन्ही लढती गमावल्या आणि पंजाबने डेक्कन चार्जर्सविरुद्धची लढत जिंकली तरच पंजाबला प्ले-ऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. अन्यथा चेन्नई, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता हेच संघ प्ले-ऑफस्मध्ये दिसणार हे स्पष्ट झाले आहे. युसूफ पठाणचे अष्टपैलूत्व आणि गंभीरचे अर्धशतक यांचा कोलकात्याच्या विजयात सिंहाचा वाटा होता.
श्रीवत्स गोस्वामी फक्त ६ धावांवर परतल्यावर गंभीरने मनोज तिवारीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३१ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी साकारून कोलकात्याचे विजयाचे मनसुबे स्पष्ट केले. तिवारी २४ धावांवर बाद झाल्यावर गंभीरने युसूफ पठाणसोबत जोडी जमवली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची महत्त्वपूर्ण भागी करून कोलकात्याला विजयाच्या समीप नेले. दुर्दैवाने पठाण २९ धावांवर (२५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) पार्नेलच्या गोलंदाजीवर मिड ऑफला गांगुलीकडे झेल देऊन बाद झाला. गौतम गंभीर ७ चौकारांनिशी ४६ चेंडूंत ५४ धावा काढून नाबाद राहिला.
त्याआधी, कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररणक्षण स्वीकारण्याचा निर्णय विलक्षण फलदायी ठरला. कोलकात्याच्या जिगरबाज गोलंदाजांनी पुण्याला निर्धारित षटकांत ७ बाद ११८ धावांवर रोखले. गंभीरने पुण्याच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी गोलंदाजीत अनेक महत्त्वपूर्ण चाली रचल्या. युसूफ पठाणला दुसऱ्याच षटकात आणले तर द्रुतगती गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीला फक्त शेवटचे षटक दिले. पठाणने कप्तानाचा विश्वास सार्थ ठरवित जेस्सी रायडरचा अडसर दूर केला. पण युसूफ पठाण, इक्बाल अब्दुल्ला आणि शाकिब अल हसन या फिरकी माऱ्यापुढे पुण्याला आपले बस्तान बसविता आले नाही. कोलकात्याकडून वाईट वागणूक मिळाल्यामुळे डिवचलेल्या सौरव गांगुलीसाठी हा सामना महत्त्वाचा मानला जात होता. त्याने क्रिकेटरसिकांच्या उत्स्फूर्त प्रेमाला प्रतिसाद देत आपली खेळी साकारण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने फक्त १८ धावा काढून तो माघारी परतला. हसनने त्याला बाद केले. मग युवराज सिंगने नेहमीप्रमाणेच सातत्यपूर्ण फलंदाजी करीत २४ धावा केल्या. त्याशिवाय मनीष पांडे १६, कॅल्युम फग्र्युसन १६, सचिन राणा १८ यांनी पुण्याच्या धावसंख्येत भर टाकली. युवराज आणि राणा यांनी सहाव्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी रचली.
याव्यतिरिक्त एकही चांगली भागीदारी पुण्याकडून झाली नाही. अनपेक्षितपणे अखेरचे षटक टाकणाऱ्या बालाजीने ७ धावांत युवराज सिंग आणि सचिन राणा यांचे बळी घेतले. पठाणने २३ धावांत २, हसनने १६ धावांत २ तर अब्दुल्लाने १२ धावांत एक विकेट घेतली. कोलकात्याच्या गोलंदाजीपुढे पुण्याच्या फलंदाजांनी सपशेल हार पत्करल्याचेच चित्र दिसत होते.
संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : २० षटकांत ७ बाद ११८ (सौरव गांगुली १८, युवराज सिंग २४, सचिन राणा १८; युसूफ पठाण २/२३, शाकिब अल हसन २/१६, लक्ष्मीपती बालाजी २/७) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : (गौतम गंभीर ५४, मनोज तिवारी २४, युसूफ पठाण २९);
सामनावीर : युसूफ पठाण.

पाटील नगरीतून : नवी मुंबईकरांनी दिला आयपीएलला निरोप!
आयपीएलच्या चौथ्या हंगामाला निरोप देताना नवी मुंबईकरांचे अंतकरण हेलावले. गुरुवारी पुणे वॉरियर्स वि. कोलकाता नाइट रायडर्स हा डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील अखेरचा सामना झाला. चौथ्या हंगामातील नवा संघ पुणे वॉरियर्सचे यजमानपद यंदा पाटील स्टेडियमने भूषविले. गेल्या वर्षीय याच स्टेडियमच्या साक्षीने मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज हा अंतिम फेरीचा सामना झाला होता. त्यावेळी वानखेडे स्टेडियमचे विश्वचषक स्पध्रेनिमित्त नूतनीकरण चालू असल्यामुळे बंद होते. त्यामुळे डी. वाय. पाटील स्टेडियमच्या नशिबी सामने आले होते. पण पुढील वर्षी पुणे वॉरियर्सचा संघ स्वत:च्या मैदानावर पुण्यात खेळणार आहे. त्यामुळे २०१२मध्ये नवी मुंबईकरांच्या वाटय़ाला काय येणार, हे प्रश्नचिन्हच आहे. पण तूर्तास तरी नवी मुंबईच्या क्रिकेटचाहत्यांनी आयपीएल-४ला निरोप दिला.
दादागिरी चालली नाही..
सौरव गांगुली वि. कोलकाता किंवा दादा वि. किंग खान ही लढत पाहायला तमाम क्रिकेटरसिकांनी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आवर्जून उपस्थिती राखली होती. त्यामुळे स्टेडियम खचाखच भरले होते. दस्तुरखुद्द शाहरूख खानही संघाचे हौसले बुलंद करण्यासाठी हजर होता. दादा.. दादा.. या जयघोषात सौरवचे मैदानात आगमन झाले. फिरकी गोलंदाज इक्बाल अब्दुल्लाला एकेरी धाव काढून खाते खोलणाऱ्या गांगुलीने मग त्याच्या १०व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लाँगऑन षटकार ठोकून कोलकाताला सावधतेचा इशारा दिला. परंतु मागील सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या गांगुलीला या ‘ठस्सन’च्या सामन्यात फार मोठी धावसंख्या साकारता आली नाही. १८ धावांवर असताना बंगालच्या टायगरला बांगला टायगरने घरचा रस्ता दाखविला. फिरकी गोलंदाज शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर उडालेला झेल टिपण्यात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उभ्या युसूफ पठाणने कोणतीही कसूर केली नाही. दादागिरी दाखविण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेला गांगुली निराश होऊन तंबूकडे परतला आणि चाहत्यांचाही हिरमोड झाला.


solapur pune pravasi sangatana