कोलकातावर कोची पडली भारी

कोची, ४ मे
अव्वल स्थानावर पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सवर कोची टस्कर्स केरळचा संघ भारी पडला आणि आपल्या घरच्या मैदानात त्यांना धूळ चारली. कर्णधार महेला जयवर्धनेचे अर्धशतक आणि ब्रॅड हॉजने साकारलेल्या तुफानी खेळीच्या जोरावर कोचीला प्रथम फलंदाजी करताना १५६ धावा करता आल्या. पण हे आव्हान मोठे वाटत नसले तरी कोचीच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यापुढे कोलकाताचे काहीही चालले नाही आणि त्यांना १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अखेरच्या षटकांमध्ये येऊन १९ चेंडूत नाबाद ३५ धावाची फटकेबाजी करणाऱ्या ब्रॅड हॉजला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोचीच्या १५७ धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात जॅक कॅलिस (४५) आणि इऑन मॉर्गन यांनी झोकात करून दिली. या दोघांनी ६९ धावांची सलामी दिल्यावर कोलकाता सामना जिंकेल असे वाटत होते. पण कॅलिसला गोमेझने बाद केले आणि सामन्याचे रूपच बदलले. कॅलिस पाठोपाठ कर्णधार गौतम गंभीर शून्यावर बाद झाला.
इऑन मॉर्गन एका बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवली असली तरी त्याला अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभली. इऑन मॉर्गन ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची एकाकी झुंज दिली, पण त्याची ही अर्धशतकी खेळी कोलकाताला विजय मिळवून देऊ शकली नाही. गोमेझने यावेळी १४ धावांत २ बळी घेत कोलकाताच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोचीच्या संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यांची २ बाद ३० अवस्था असताना कर्णधार महेला जयवर्धने फलंदाजीला आला आणि त्याने कर्णधाराला साजेशी अर्धशतकी खेळी साकारत संघाला सुस्थितीत आणले. जयवर्धनेने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली आणि संघाला शतकाची वेस  ओलांडून दिली. कोचीचा संघ दीडशे धावा करणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटत असले तरी हॉजने १९ चेंडूत ३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ३५ धावांची तडफदार खेळी साकारली आणि त्याच्या या खेळीच्या जोरावरच कोचीला १५६ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
कोची टस्कर्स केरळ-: २० षटकांत ५ बाद १५९ (महेला जयवर्धने ५५, ब्रॅड हॉज नाबाद ३५, जयदेव उनाडकट २५ धावांत २ बळी) विजयी वि. कोलकाता नाइट रायडर्स २० षटकांत ७ बाद १३९ ( इऑन मॉर्गन ६६, जॅक कॅलिस ४५, आर. गोमेझ १४ धावांत २ बळी). सामनावीर-: ब्रॅड हॉज.


solapur pune pravasi sangatana