कोहलीची कमाल!रॉयल चॅलेंजर्सचा दिल्लीवर रोमहर्षक विजयी

वी दिल्ली, २६ एप्रिल/पीटीआय
उत्कंठापूर्ण लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आज दिल्ली डेअरडेव्हिल्सवर तीन विकेट व तीन चेंडू राखून रोमहर्षक विजय नोंदविला. विजयासाठी १६१ धावांचे आव्हान त्यांनी सात विकेट्सच्या मोबदल्यात व १९.३ षटकांत पार केले. अर्धशतक झळकावणारा विराट कोहली बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला.बंगळुरु संघाची सुरुवात खराबच झाली. त्यांचा भरवशाचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याला खाते उघडण्यापूर्वीच अशोक दिंडा याने बाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर ख्रिस गेल व विराट कोहली यांनी चौफेर फटकेबाजी करीत मैदान दणाणून सोडले. गेलपेक्षा आज कोहलीच जास्त आक्रमक खेळ करीत होता.
होप्सच्या षटकात उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात गेल (२६) याने वेणुगोपाळकडे झेल दिला. गेल व कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७.२ षटकांत ८२ धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर बंगळुरुचा डाव कोसळला. पाठोपाठ डी’व्हिलीयर्स (५) व कोहली यांच्या विकेट्स बंगळुरूने गमावल्या. मोर्न मोर्कलने कोहलीचा त्रिफळा उडविला. त्याने ३८ चेंडूंमध्ये आठ चौकार व दोन षटकारांसह ५६ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा केवळ ७ धावा काढून बाद झाला. सौरभ तिवारीने एक षटकार व एक चौकार मारुन झकास सुरुवात केली होती. परंतु आत्मघातकी फटका मारुन त्याने मोर्कलच्या षटकांत यष्टिरक्षक ओझाकडे झेल दिला. तिवारीने १८ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या सईद महंमद याने उमेश यादवला लागोपाठ दोन चौकार मारुन संघाचा विजय दृष्टिपथात आणला. दुसऱ्या बाजूने कर्णधार व्हेटोरीने दमदार फटकेबाजी केली. या जोडीने २१ धावांची अखंडित भागीदारी करीत संघास विजयश्री मिळवून दिली. तत्पूर्वी, सुरुवातील दिल्लीची ३ बाद ६८ अशी स्थिती होती. जेम्स होप्स व वाय.वेणुगोपाळराव यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत ही घसरगुंडी थोपविली. त्यांनी ५.३ षटकांत ४७ धावांची भर घातली. वेणुगोपाळचा डॅनियल व्हेटोरीने त्रिफळा उडवित ही जोडी फोडली. होप्सने अप्रतिम फलंदाजी करीत ४३ चेंडूंमध्ये सात चौकारांसह ५४ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ६ बाद १६० (वीरेंद्र सेहवाग २५, जेम्स  होप्स ५४) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १९.३ षटकांत ७ बाद १६१ (ख्रिस गेल २६, विराट कोहली ५६, मोर्न मोर्कल ३/२५); सामनावीर : विराट कोहली.


solapur pune pravasi sangatana