खांद्याच्या दुखापतीमुळे सेहवाग आयपीएलबरोबरच विंडीज दौऱ्यालाही मुकणार

नवी दिल्ली, ९ मे
दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार आणि तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवाग याची खांद्याची दुखापत पुन्हा एकदा बळावली असून त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या शस्त्रक्रियेसाठी त्याला लंडनला जावे लागणार असल्याने तो उर्वरित आयपीएलच्या सामन्यांबरोबरच वेस्ट इंडिज दौऱ्यालाही मुकणार आहे. दुखापतीमुळे सेहवाग उर्वरित आयपीएलच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याने त्याच्या गैरहजेरीत संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स होप्सकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत माथूर यांनी दिली. ते या संदर्भात पुढे म्हणाले की, सेहवाग हा संघाचा अविभाज्य भाग होता. पण खांद्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला लंडनला जावे लागत असल्याने तो उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या गैरहजेरीत जेम्स होप्स संघाचे नेतृत्व करेल.
सेहवाग आणि बीसीसीआय यांच्याशी सल्लामसलत करूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे. गेल्या सामन्यांमध्ये सेहवागला दुखापत जाणवत होती. बीसीसीआयने त्याच्या शस्त्रक्रियेची सर्व तयारी केली असून त्याला लगेचच लंडनला जावे लागणार आहे, अशी माहिती दिल्लीच्या संघाचे मालक पी. बी. वांची यांनी दिली.
सध्याच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक ४२४ धावा करत सेहवागने ‘ऑरेंज कॅप’ पटकाविली होती. त्याच्या दमदार फलंदाजीच्या जोरावरच दिल्लीने काही सामने जिंकले होते. सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. शस्त्रक्रियेमुळे सेहवागला वेस्ट इंडिजच्या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. वेस्ट इंडिजचा दौरा १ जूनपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एक ट्वेन्टी-२० सामना, पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण दुखापतीनंतर सेहवागला काही काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याने त्याला या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. पण त्याचा विचार इंग्लंडच्या दौऱ्यासाठी केला जाऊ शकतो.


solapur pune pravasi sangatana