ख्रिस गेलची कोची टस्कर्सवर दहशत

बंगळुरू, ७ मे
फॉर्मात असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सला हरविल्यानंतर कोची टस्कर्स केरळने आपला चांगलाच दबदबा निर्माण केला असला तरी रविवारी त्यांची गाठ पडणार आहे ती ख्रिस गेल नामक वादळाशी. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करताना नेमकी हीच दहशत कोची संघावर आहे. कोचीने या आठवडय़ात कोलकाताचा १७ धावांनी पराभव केला. परंतु उद्या त्यांना गेलशी सामना करायचा आहे. वेस्ट इंडिजचा हा स्फोटक फलंदाज आपल्या अव्वल फॉर्मात असून, बंगळुरूसाठी दोन शतके झळकावण्याची किमया त्याने साधली आहे.
शुक्रवारी गेल वादळामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचा अक्षरश: पालापाचोळा झाला. फक्त ४९ चेंडूंत त्याने १०७ धावा केल्या. यापैकी ९६ धावा या १० चौकार आणि नऊ षटकारांनिशी गेल फटकाविल्या. त्यामुळे गेलला वेसण घालणे हेच कोचीच्या आर. विनयकुमार आणि एस. श्रीशांत या वेगवान माऱ्याचे प्रमुख लक्ष्य असेल. गेलशिवाय तिलकरत्ने दिलशान, विराट कोहली आणि ए. बी. डी’व्हिलियर्स यांची आक्रमकता आणि दर्जा हासुद्धा कोचीपुढे डोकेदुखी ठरणार आहे. झहीर खानला फारशा विकेट मिळत नसल्या तरी बंगळुरूची गोलंदाजी मागील दोन सामन्यांमध्ये भाव खाऊन गेली होती. श्रीशांत अरविंदने मोक्याच्या क्षणी घेतलेले बळी संघासाठी महत्त्वाचे ठरले.
तथापि, ब्रॅन्डन मॅक्क्युलम, कर्णधार महेला जयवर्धने, पार्थिव पटेल, रवींद्र जडेजा आणि ब्रॅड हॉग ही कोचीची फलंदाजीची फळी बंगळुरूच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकेल.
बंगळुरूने ९ सामन्यांमध्ये ११ गुण कमविले असून, आणखी दोन गुण अव्वल फेरीतील त्यांच्या आशा अधिक पक्क्या करणारे ठरतील.  


solapur pune pravasi sangatana