गिलख्रिस्टचा तडाखा!

*पंजाबपुढे बंगळुरूचा धुव्वा *गिलख्रिस्ट १०६, मार्श नाबाद ७९ * दुसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची झंझावाती विक्रमी भागीदारी
धरमशाला, १७ मे

आकाशात विजांचा लखलखाट तर मैदानात चौकार व षटकारांचा वर्षांव अशा पाश्र्वभूमीवर मंगळवारी येथे झालेल्या लढतीत कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट याचे शतक व त्याने पाऊणशतकी खेळी साकारणाऱ्या शॉन मार्शसोबत केलेली झंझावाती विक्रमी भागीदारी पंजाबच्या पथ्यावर पडली. त्यामुळेच किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर तब्बल १११ धावांनी मात केली. वादळी शतक आणि क्षेत्ररक्षणात  एक यष्टीचीत व दोन झेल टिपणाऱ्या गिलख्रिस्टला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.हिमाचल प्रदेशातील क्रिकेट चाहत्यांना खेळाचा निखळ आनंद देत पंजाबने २० षटकांत २ बाद २३२ धावा अशी विक्रमी धावसंख्या उभारली, तेव्हा तेथेच त्यांच्या विजयाचा पाया रचला गेला होता. गिलख्रिस्ट (५५ चेंडूंत १०६) याचे तडाखेबाज शतक व त्याने मार्श (४९ चेंडूंत नाबाद ७९) याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी केलेली २०६ धावांची झंझावाती भागीदारी हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. पंजाबने ठेवलेले आव्हान बंगळुरुच्या फलंदाजांना झेपलेच नाही. झंझावाती फलंदाजीबाबत ख्यातनाम असलेल्या ख्रिस गेल याला सात चेंडूंत आपले खातेही उघडता आले नाही. शून्यावरच गिलख्रिस्टने रियान हॅरिसच्या षटकांत त्याला अप्रतिमरीत्या टिपले. गेल बाद झाला आणि बंगळुरुच्या डावास खिंडार पडले ते न बुजण्यासाठीच. पाठोपाठ त्यांच्या फलंदाजांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचेच काम केले. सौरभ तिवारी (६), विराट कोहली (११), असाद पठाण (७) या भरवशाच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अब्राहम डी’व्हिलीयर्स (२७ चेंडूंत तीन चौकार व एक षटकारासह ३४) याचा अपवाद वगळता त्यांचे अन्य फलंदाज खेळपट्टीवर टिकले नाहीत. पीयुष चावला (४/१७) व रियान हॅरिस (३/२८) यांच्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांचा डाव १७ षटकांत १२१ धावांवर कोसळला.
त्याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय सार्थ ठरवितच फलंदाजी केली. त्यांनी पॉल व्हल्थाटी (२ चौकार व एक षटकारासह २०) याची विकेट लवकर गमावली, तथापि त्यानंतर गिलख्रिस्ट व मार्श यांनी अक्षरश: चौफेर घणाघाती फटकेबाजी करीत मैदान दणाणून सोडले. त्यांनी बंगळुरुच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. केवळ ५३ चेंडूंत शतक टोलविणाऱ्या गिलख्रिस्टने ५५ चेंडूंत १०६ धावा करताना नऊ षटकार व आठ चौकार अशी फटकेबाजी केली. मार्शनेही आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याला यथार्थ साथ देताना नाबाद ७९ धावा केल्या. त्याने सात चौकार व पाच षटकार अशी टोलेबाजी केली. त्यांनी १६ षटकांत २०६ धावांची भागीदारी केली. संघाच्या २०० धावा त्यांनी फक्त ९६ चेंडूंत पूर्ण केल्या. बंगळुरुकडून चार्ल्स लॅंगवेल्ट्ड याने ४८ धावांमध्ये दोन बळी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत २ बाद २३२ (पॉल वल्थाटी २०, अ‍ॅडम गिलख्रिस्ट १०६, शॉन मार्श नाबाद ७९; चार्ल्स लॅंगवेल्ट्ड २/४८) विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १७ षटकांत सर्वबाद १२१ (अब्राहम डी’व्हिलीयर्स ३४, महम्मद कैफ १५; पीयुष चावला ४/१७, रियान हॅरिस ३/२८, शलाब श्रीवास्तव २/३०)


solapur pune pravasi sangatana