गेलच्या शतकापुढे कोलकाताचा पालापाचोळा

कोलकाता, २२ एप्रिल/पीटीआय
वेस्ट इंडिज संघातून वगळलेल्या ख्रिस गेल याच्या नावात काय जादू आहे याचा प्रत्यय घडवीत गेलने आज षटकार व चौकारांचा पाऊस पाडत नाबाद शतक टोलविले, त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाइट रायडर्सवर नऊ विकेट्स व ११ चेंडू राखून मात केली.
या स्पर्धेत आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये केवळ एकच विजय मिळवू शकणाऱ्या बंगळुरू संघाने गेलला करारबद्ध केले आणि त्याने यंदाच्या या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात तुफानी फटकेबाजी करीत नाबाद १०२ धावा केल्या. त्यामुळेच विजयासाठी आवश्यक असणारे १७२ धावांचे आव्हान १८.१ षटकांत व केवळ एक गडय़ाच्या मोबदल्यात पार केले. त्याला तिलकरत्ने दिलशान (३८) व विराट कोहली (नाबाद ३०) यांचीही यथार्थ साथ लाभली. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने २० षटकांत ५ बाद १७१ धावा केल्या. जॅक कॅलिस (४२), कर्णधार गौतम गंभीर (४८) व युसूफ पठाण (४६) यांनी केलेल्या शैलीदार फलंदाजीचा त्यामध्ये समावेश होता.
नाणेफेक जिंकून बंगळुरू संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कोलकाताने ब्रॅड हॅडिन (१८) याची विकेट लवकर गमावली. तथापि, त्यानंतर कॅलिस व गंभीर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भर घातली. कॅलिसने ४२ चेंडूंमध्ये चार चौकारांसह ४० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर त्यांच्याकडून मोठी भागीदारी झाली नाही, तथापि गंभीर व पठाण यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाता संघास १७१ अशी आश्वासक धावसंख्या रचता आली. गंभीरने ३८ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ४८ धावा केल्या. विश्वचषक व त्यापाठोपाठ या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये फारशी चमक दाखवण्यात अपयशी ठरलेल्या पठाणने आज नावलौकिकास साजेसा खेळ केला. त्याने २४ चेंडूंमध्ये तीन चौकार व तेवढेच षटकार मारून ४६ धावा केल्या. त्याची ही आक्रमक खेळी गेलच्या खेळापूर्वीची रंगीत तालीम होती.
विजयासाठी १७२ धावांच्या माफक आव्हानास सामोरे जाताना गेल व दिलशान यांनी बंगळुरू संघास झकास सलामी मिळवून दिली. त्यांनी षटकामागे दहा धावांचा वेग ठेवीतच कोलकाता संघाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी ५० धावा ३३ चेंडूंमध्ये पूर्ण केल्या, तर संघाचे आणि भागीदारीचे शतक त्यांनी ६२ चेंडूंमध्ये पूर्ण केले. गेलने स्वत:चे अर्धशतक केवळ २९ चेंडूंमध्ये पूर्ण केले. हीच जोडी संघास विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच लक्ष्मीपती बालाजीने दिलशानचा त्रिफळा उडविला. दिलशानने ३१ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ३८ धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या कोहलीनेही चौफेर फटकेबाजी केली. संघाचा विजय दृष्टिपथात आल्यामुळे गेल शतकापासून वंचित राहणार काय अशी शंका निर्माण झाली होती, तथापि १८व्या षटकातील पाच चेंडू खेळून काढत कोहलीने विराट मोठेपणा दाखवीत गेलला विजयी फटका व शतक पूर्ण करण्याची संधी दिली. गेलने शकीब उल हसनला चौकार मारून संघाचा विजय व स्वत:चे शतक पूर्ण केले. गेलने ५५ चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावा करताना १० चौकार व सात षटकार अशी आतषबाजी केली. कोहलीने २३ चेंडूंमध्ये एक षटकार व तीन चौकारांसह नाबाद ३० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स :
२० षटकांत ५ बाद १७१ (जॅक कॅलिस ४०, गौतम गंभीर ४८, युसूफ पठाण ४६, एस. अरविंद २/३७, सईद अहमद १/२०). विजयी वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १८.१ षटकांत १ बाद १७५ (ख्रिस गेल नाबाद १०२, तिलकरत्ने दिलशान ३८, विराट कोहली नाबाद ३०, लक्ष्मीपती बालाजी १/४३).
   


solapur pune pravasi sangatana