चेन्नई अंतिम फेरीत दाखल मॉर्केलची तुफानी फटकेबाजी

मुंबई, २४ मे
वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जने कमाल केली. चार षटकांत ५८ धावांची आवश्यकता.. हे चित्र जेव्हा दिसत होते. तेव्हा चेन्नईजिंकेल असे कुणालाही वाटले नव्हते. परंतु सुरेश रैनाने अशक्य ते शक्य करून दाखविण्याची जिगरबाज वृत्ती दाखवून चेन्नईचा रोमहर्षक विजय साकारला. दोन चेंडू आणि ६ विकेटस् राखून मिळविलेल्या या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्जचे चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर २८ मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीचे स्वप्न साकारले आहे. तर बंगळुरूला आता आपले स्वप्न साकारण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध असेल.सुरेश रैनाने ५० चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांसह आपली ७३ धावांची नाबाद झुंजार खेळी साकारताना एस. बद्रीनाथ (३४), महेंद्रसिंग धोनी (२९) आणि अ‍ॅल्बी मॉर्केल (नाबाद २८) यांच्यासोबत तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. झहीर खानचे १७वे, एस. अरविंदचे १९वे आणि डॅनियल व्हेटोरीचे २०वे षटक सामन्याचा निकाल फिरविण्यासाठी मोलाचे ठरले. १२ चेंडूंत ३३ धावा हव्या असताना मैदानावर होती रैना आणि मॉर्केल ही जोडी. मॉर्केलने कुणतीही भिड न बाळगता एस. अरविंदच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला. रैनानेही त्याला छान साथ दिली. या षटकात या जोडीने २१ धावा कुटल्या. मग अखेरच्या षटकात चेन्नईला १२ धावांची आवश्यकता होती. पण रैनानेही एकेरी धाव काढून स्ट्राइक मॉर्केलकडे देण्याचा मोठेपणा दाखविला. मॉर्केलने व्हेटोरीच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून विजय दृष्टीपथात आणला. मग चौथ्या चेंडूवर थेट मिडविकेटला षटकार मारून विजयश्री खेचून आणली. मॉर्केल १० चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारासह नाबाद २८ धावा केल्या.
त्याआधी, महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आयपीएलच्या चौथ्या हंगामात दहशत निर्माण करणारा ख्रिस गेल लवकर बाद झाला तरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ४ बाद १७५ ही आव्हानात्मक धावसंख्या उभारली. विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरूला ही धावसंख्या उभारता आली. मयांग अगरवाल ३४, ल्युक पोमर्सबॅक यांनीही बंगळुरूच्या धावसंख्येत मोलाची भर टाकली. कोहलीने केलेल्या तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या बंगळुरूसाठी उपयुक्त ठरल्या. कोहलीने फक्त ४४ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्याने आपली नाबाद ७० धावांची खेळी फुलवली. कोहलीने १६व्या षटकात अश्वीनला पहिला षटकार मारला. तर १९व्या षटकात मॉर्केलच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत कोहलीने लाँग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारले. या षटकात कोहली-तिवारी जोडीने १९ धावा चोपल्या.
चेन्नईने गेलचे वादळी मनसुबे उधळताना फक्त ८ धावांवर त्याला तंबूची वाट दाखविली. आर. अश्वीनने त्याला पायचीत केले. मग आलेल्या विराट कोहलीने आधी मयांक अगरवालसोबत दुसऱ्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी केली. अगरवालचा अडसर ड्वेन ब्राव्हाने दूर केला. अगरवालने ३४ धावा काढल्या. ए. बी. डी’व्हिलियर्स फक्त ११ धावांची भर घालू शकला. त्यानंतर कोहलीने ल्युक पोमर्सबॅकसोबत चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. पोमर्सबॅकचा (२९) डग बोलिंगरने त्रिफळा उडविला. मग कोहलीने सौरभ तिवारीसोबत पाचव्या विकेटसाठी नाबाद ४२ धावांची भागी रचली.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ४ बाद १७५ (मयांक अगरवाल ३४, विराट कोहली नाबाद ७०, ल्युक पोमर्सबॅक २९; डग बोलिंगर १/२०) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.४ षटकांत ४ बाद १७७ (सुरेश रैना नाबाद ७३, एस. बद्रीनाथ ३४, महेंद्रसिंग धोनी २९, अ‍ॅल्बी मॉर्केल नाबाद २८; झहीर खान २/३१). सामनावीर : सुरेश रैना.


solapur pune pravasi sangatana