चेन्नई सुपर किंग्जवर आरामात विजय

गुणतालिकेतील  अग्रस्थान काबीज
गेलची आणखी एक वादळी खेळी
बंगळुरू, २२ मे

ख्रिस गेल नावाच्या वादळाने रविवारी चेन्नई सुपर किंग्जसारख्या दिग्गज संघाला चिरडून टाकले. फक्त ५० चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांची झंझावाती खेळी साकारणाऱ्या या अवलियाने ‘ऑरेंज कॅप’सहित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ८ विकेटस् आणि दोन षटके राखून ‘रॉयल’ विजय मिळवित गुणतालिकेत प्रथम स्थान काबीज केले आहे. त्यामुळे गेल आणि बंगळुरू दोघेही अव्वल नंबर ठरले आहेत.
गोलंदाजांनी फक्त १२८ धावांवर चेन्नईला रोखल्यानंतर गेल आणि विराट कोहलीने महत्त्वपूर्ण भागीदारी साकारून उर्वरित सोपस्कार पूर्ण केले. सामनावीर गेलच्या याच कामगिरीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमवरील तमाम क्रिकेटरसिकांच्या मुखी ‘गेल डन’ हेच गौरवोद्गार होते.
या विजयानिशी आता बंगळुरूने साखळी स्पध्रेच्या समाप्तीअंती गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले असून, २४ तारखेला त्यांचा पहिला अंतिम फेरी पात्रता सामना होईल. बंगळुरूने १४ सामन्यांत सर्वाधिक १९ गुण कमविले आहेत. त्यामुळे ही लढत गमावली तरी त्यांना अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी असेल.
गेलने रविवारी आक्रमक पण सावध खेळ केला. आपल्या वादळी खेळीच्या सुरुवातीला गेलने डग बोलिंगर आणि सुरेश रैना यांना मनसोक्त फटकेबाजी केली.
जमैकाच्या या भारदस्त फलंदाजांने ९ डावांत ५११ धावा काढताना शॉन मार्शला (५०४) मागे टाकत ऑरेंज कॅपवर प्रभुत्व मिळविले.
ए. बी. डी’व्हिलियर्स भोपळाही न फोडता माघारी परतल्यावर गेलला विराट कोहलीची छान साथ लाभली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून बंगळुरूच्या विजयाचा पाया रचला. कोहली ३१ धावांवर बाद झाल्यावर गेलने सौरभ तिवारी (नाबाद १३) याच्याासोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ४९ धावांची भागीदारी केली आणि बंगळुरूचा दणदणीत विजय साजरा केला.
त्याआधी, चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित २० षटकांत ८ बाद १२८ धावा केल्या. यात प्रामुख्याने योगदान होते ते ४० चेंडूंत ३ चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार ठोकणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे. एकीकडून चेन्नईचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत असताना धोनीच्या खेळीने चेन्नईला दिलासा मिळाला.
धोनीने विशेषत: बंगळुरूचा वेगवान गोलंदाज अभिमन्यू मिथुनची धुलाई केली. अखेरच्या षटकात मिथुनने १७ धावा दिल्या. तर एकंदर ४ षटकांत मिथुनने ३५ धावांत एकमेव बळी घेतला. झहीर खान, एस. अरविंद आणि डॅनियल व्हेटोरी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.   
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ८ बाद १२८ (वृद्धीमान साहा २२, महेंद्रसिंग धोनी ७०; झहीर खान २/१९, एस. अरविंद २/२०, डॅनियल व्हेटोरी २/१५) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : १८ षटकांत २ बाद १२९ (ख्रिस गेल नाबाद ७५, विराट कोहली ३१); सामनावीर : ख्रिस गेल.


solapur pune pravasi sangatana