चेन्नईच किंग्ज

राजस्थानवर ६३ धावांनी दणदणीत विजय
जयपूर, ९ मे

यंदाच्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सला दोन्हीही सामन्यात दणदणीत पराभूत करत चेन्नई सुपरने आपणच किंग्ज असल्याचे दाखवून दिले. मुरली विजयचे अर्धशतक, मायकेल हसी, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या धडाकेबाज खेळींच्या जोरावर पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईने १९६ धावा फटकाविल्या. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत राजस्थानला १३३ धावांमध्ये रोखले आणि संघाला दणदणीत ६३ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयाने चेन्नईने बाद फेरीच्या दिशेने मोठे पाऊल पुढे टाकले आहे. अर्धशतकवीर मुरली विजयलाच यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
१९७ धावांचे आव्हान हे ट्वेन्टी-२०मध्ये नक्कीच मोठे समजले जाते आणि याचाच प्रत्यय आजच्या सामन्यात आला. राजस्थानच्या अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता काही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही आणि त्यांना ६३ धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. रहाणेने सात चौकारांच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली, पण अन्य फलंदाजांना त्याला चांगली साथ देता आला नाही. सुरेश रैनाने यावेळी एकही धाव न देता दोन विकेट्स पटकाविल्या. तर डग बोलिंगरने २२ धावांत ३ मोहरे टिपले.
तत्पूर्वी, मुरली विजयचे अर्धशतक आणि मायकेल हसी, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सपुढे १९७ धावांचे आव्हान ठेवले. मायकेल हसी (४६) आणि मुरली विजय या सलमीवीरांनी यावेळी ७७ धावांची दणदणीत सलामी दिली. मुरली विजयने यावेळी २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. मुरली विजय बाद झाला तेव्हा १४.४ षटकांत चेन्नईच्या १३५ धावा होत्या. पण त्यानंतर सुरेश रैना आणि कर्णधार धोनी यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत संघाला १९६ धावा फटकावून दिल्या. रैनाने यावेळी २७ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ४३ धावा फटकाविल्या. यावेळी रैनापेक्षा धोनी जास्त आक्रमकपणे खेळला. त्याने १९ चेंडूत प्रत्येकी तीन चौकार आणि षटकारांची अतिषबाजी करत नाबाद ४१ धावांचा पाऊस पाडला. पण मुरली विजयचा अपवाद वगळता या तिघांनाही यावेळी अर्धशतकाचा उंबरठा ओलांडता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज-: २० षटकांत ३ बाद १९६ (मुरली विजय ५३, मायकेल हसी ४६, जोहान बोथा २३ धावांत १ बळी). विजयी वि. राजस्थान रॉयल्स -: १९.३ षटकांत सर्वबाद १३३ (अजिंक्य रहाणे ५२, सुरेश रैना ० धावांत २ बळी, डग बोलिंगर २२ धावांत २ बळी). सामनावीर-: मुरली विजय.


solapur pune pravasi sangatana