चेन्नईचा पुण्यावर सलग दुसरा विजय

नवी मुंबई, २७ एप्रिल
चेन्नईवर बुधवारी डग बोलिंगर आणि सुब्रमण्यम बद्रिनाथ प्रसन्न झाले. त्यामुळेच डी. वाय. पाटील स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज संघाने पुणे वॉरियर्सवर आठ विकेटस् आणि तीन चेंडू राखून शानदार विजय मिळविला. आयपीएलच्या चौथ्या हंगामातील चेन्नईचा हा चौथा तर पुण्यावरील दुसरा विजय. बद्रिनाथने ६ चौकार आणि २ षटकारांसह ४४ चेंडूंमध्ये ६३ धावांची दमदार खेळी साकारली. त्याआधी वेगवान गोलंदाज डग बोलिंगरने २१ धावांत तीन बळी घेत पुण्याच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्यामुळेच चेन्नईला हा विजय संपादन करता आला. सामनावीर पुरस्कारावरही बोलिंगरनेच नाव कोरले.
सोमवारी पुण्यावर मिळविलेल्या विजयाचा शिल्पकार मायकेल हसीने निराशा केल्यानंतर सुब्रमण्यम बद्रिनाथने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. आधी त्याने मुरली विजय (३१) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ७ षटकांत ६१ धावांची भागीदारी केली. मग सुरेश रैनासोबत तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची नाबाद भागीदारी रचली. या दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्यांमुळेच चेन्नईला हा विजय सुकर झाला. सुरेश रैनाने २५ चेंडूंमध्ये एक चौकार आणि दोन षटकारासह ३४ धावा केल्या. अल्फान्सो थॉमसच्या २०व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लाजवाब चौकार मारून बद्रिनाथने चेन्नईचा विजय साजरा केला. बद्रिनाथने मुरली कार्तिक आणि युवराजला लाँग ऑफला मारलेले षटकार तर दाद देणारेच होते.
तत्पूर्वी, युवराज सिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली खरी. पण हा निर्णय प्रारंभी फारसा फलदायी ठरला नाही. सावधपणे प्रारंभ करणाऱ्या जेस्सी रायडरने न्यूवान कुलसेकराच्या तिसऱ्या षटकात जोरदार हल्ला चढवित तीन चौकार ठोकले. पण डग बोलिंगरचे चौथे षटक चेन्नईसाठी यशदायी ठरले. बोलिंगरने पहिल्याच चेंडूवर रायडरचा (१९) तर तिसऱ्या चेंडूवर मोहनिष मिश्राचा अडसर दूर केला. तर मिथुन मिन्हास भोपळा फोडण्यातही अपयशी ठरला. कुलसेकराने त्याचा त्रिफळा उडविला. मग मनीष पांडेला टिम साऊदीने १० धावांवर तंबूची वाट दाखवत पुण्याची ४ बाद ४१ अशी अवस्था केली. मग पुण्याचा संघनायक युवराज सिंगने रॉबिन उथप्पाच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उथप्पाने अश्वीनच्या १२व्या षटकात मिडविकेटला शानदार षटकार ठोकला. अश्वीनच्या १४व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर उथप्पाने पुन्हा मिडविकेटला षटकार मारला आणि अपेक्षा उंचावल्या. परंतु दुसऱ्याच चेंडूवर श्रीकांतकडे झेल देऊन उथप्पा माघारी परतला. त्याने दोन चौकार आणि दोन षटकारांसह ३१ धावा केल्या. युवराज सिंग मात्र एका बाजूने किल्ला लढवित होता.
अश्वीनच्या १६व्या षटकात मिडविकेटला तर बोलिंगरच्या १७व्या षटकात युवराजने लाँगऑफला षटकार खेचून आपला इरादा प्रकट केला. युवराज- मार्श जोडीने सहाव्या विकेटसाठी ४० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बोलिंगरने मार्शला बाद करून ही जोडी फोडली. मग साऊदीच्या शेवटच्या षटकात युवराजने लाँगऑफला आणि मिडविकेटला षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. युवराजने ४३ चेंडूंत ३ चौकार आणि चार षटकारांसह ६२ धावा केल्या. त्यामुळेच पुण्याला १४१ धावा उभारता आल्या.
संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : २० षटकांत ६ बाद १४१ (युवराज सिंग नाबाद ६२, रॉबिन उथप्पा ३१; डग बोलिंगर ३/२१) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज : १९.३ षटकांत २ बाद १४५ (मुरली विजय ३१, एस. बद्रिनाथ नाबाद ६३, सुरेश रैना नाबाद ३४); सामनावीर : डग बोलिंगर.


solapur pune pravasi sangatana