चेन्नईचा राजस्थानवर आठ विकेट्सनी विजय

चेन्नई, ४ मे
मायकेल हसी आणि सुरेश रैना या दोन्हीही डावखुऱ्यांनी राजस्थान रॉयल्सला तडाखा देत चेन्नई सुपर किंग्जला आठ विकेट्स आणि आठ चेंडू राखून सहज विजय मिळवून दिला. राजस्थानने राहुल द्रविडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईपुढे विजयासाठी १४८ धावांचे आव्हान ठेवले होते. पण हसी आणि रैना या दोघांनाही राजस्थानची गोलंदाजी बोथट करत त्यांच्यावर हल्ला चढवला आणि संघाला सोपा विजय मिळवून दिला. १४८ धावांचे आव्हान फारसे मोठे वाटत नसले तरी राजस्थानचा कर्णधार शेन वॉर्न याने आपल्या गोलंदाजांना साथीला घेत बऱ्याचदा कमी धावा असतानाही संघाला विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल, अशी आशा होती. सलामीवीर मुरली विजय (५) झटपट बाद झाल्यावर तर वॉर्नची जादू चालणार असेच वाटत होते. पण हसी आणि रैना यांनी वॉर्नच्या संघाला धक्का देण्याचे काम चोख बजावले. त्यांनी वॉर्न, बोथा आणि वॉटसन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांना सहजपणे खेळून काढले. तर अन्य गोलंदाजांवर चौफर हल्ला चढवत विजयी लक्ष्य गाठले. हसीने या वेळी ५५ चेंडू आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७९ धावा फटकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर रैनानेही तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी साकारून हसीला सुयोग्य साथ दिली. यावेळी जोहान बोथा आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला असला तरी अन्य गोलंदाजांच्या हाती मात्र काहीच लागले नाही.तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या सलामीवीरांनी ८६ धावांची सलामी देत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. शेन वॉटसनने या वेळी पाच चौकारांच्या साहाय्याने ३२ धावांची खेळी साकारली. तर राहुल द्रविडने या वेळी दहा चौकारांची बरसात करत ६६ धावा फटकाविल्या. पण सलामीची जोडी फुटल्यावर राजस्थानच्या अन्य फलंदाजांना जास्त धावा करता आल्या नाहीत आणि त्यांचा डाव १४७ धावांत संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स-: २० षटकांत ६ बाद १४७ (राहुल द्रविड ६६, शादाबा जकाती २२ धावांत २ बळी, अ‍ॅल्बी मॉर्केल २४ धावांत २ बळी) पराभूत वि. चेन्नई सुपर किंग्ज -: १८.४ षटकांत २ बाद १४९ (मायकेल हसी नाबाद ७९, सुरेश रैना ६१, जोहान बोथा २२ धावांत २ बळी) . सामनावीर-: मायकेल हसी


solapur pune pravasi sangatana