डेक्कनचीच दादागिरी, पुण्यावर ६ विकेट्सनी विजय ल्ल अमित मिश्रा ठरला सामनावीर

नवी मुंबई, १६ मे
दादाच्या पायगुणाने पराभवाच्या गर्तेत अडकलेला पुण्याचा संघ विजयपथावर पुन्हा आला होता. पण आज दादा ‘फ्लॉप’ ठरला तर पुणे वॉरियर्सचा संघ ‘सुपर फ्लॉप’. आज संपूर्ण सामन्यात ‘दादागिरी’ पाहायला मिळाली ती डेक्कन चार्जर्सची. डेक्कनच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पुण्याला १३६ धावांमध्ये रोखले. तर फलंदाजांनीही त्यांची जबाबदारी चोख बजावत पुण्यावर ६ विकेट्स आणि ४ चेंडू राखत विजय संपादन केला. आपल्या फिरकीच्या तालावर पुण्याच्या फलंदाजांना नाचवणाऱ्या अमित मिश्राला यावेळी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पुण्याच्या १३७ धावांचा पाठलाग करताना सन्नी सोहल (३४) आणि शिखर धवन (२८) या दोघांनी ६७ धावांची सलामी देत डेक्कनला भक्कम सुरुवात करून दिली. या दोघांनी मिशेल मार्शच्या सहाव्या षटकात सर्वाधिक १७ धावा लुटल्या. फलंदाजांबरोबरच गोलंदाज अपयशी ठरत असताना कर्णधार युवराज स्वत: गोलंदाजीला आला आणि त्याने धवनला बाद करत ही जोडी फोडली. सलामीची जोडी बाद झाल्यावर कर्णधार कुमार संगकारा (२५) आणि जे. पी. डय़ुमिनी (२३) यांनी सावध फलंदाजी करत संघाचा धावफलक हलता ठेवला. पण हे दोघेही बाद झाल्यावर पुण्याच्या गोलंदाजांनी डेक्कनच्या फलंदाजांवर दडपण वाढवले खरे, पण त्यांना सामना जिंकता आला नाही.
तत्पूर्वी, डेक्कनचा कर्णधार कुमार संगकाराने नाणेफेकजिंकल्यावर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मग गोलंदाजांनी पुण्याला १३६ धावांमध्ये रोखून त्याचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. जेस्सी रायडर (१८) आणि मनीष पांडे (२३) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली असली तरी रायडर बाद झाल्यावर त्यांच्या डावाला घरघर लागली. सौरव गांगुलीची दादागिरी यावेळी चाललीच नाही, त्याला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार युवराज सिंगने(२३) डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामध्ये त्याला अपयश आले. मिशेल मार्शने अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करत संघाला १३६ धावांचा पल्ला गाठून दिला. त्याने २८ चेंडूत १ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावा फटकाविल्या. यावेळी डेक्कनचा कर्णधार कुमार संगकाराचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, कारण त्याने गोलंदाज ज्याप्रकारे वापरले त्याला तोडच नव्हती आणि प्रत्येक गोलंदाजाने त्याला चांगली साथ दिली. डॅनियल ख्रिस्टीनने यावेळी गांगुली आणि युवराजचा अडसर दूर केला. तर अमित मिश्राने आठवे षटक निर्धाव टाकत याच षटकात दोन विकेट्स पटकाविल्या.   
संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : २० षटकांत ९ बाद १३६ (मिशेल मार्श३७, डॅनियल ख्रिस्टीयन २/१३, अमित मिश्रा २/२६) पराभूत वि. डेक्कन चार्जर्स : १९.२ षटकांत ४ बाद १३८ (सनी सोहेल ३४, राहुल शर्मा २/२५); सामनावीर : अमित मिश्रा.   


solapur pune pravasi sangatana