दिल्लीचा दणका!

दिल्ली, २३ एप्रिल
शॉन मार्श याने झुंजार ९५ धावा करुनही किंग्ज इलेव्हन पंजाबला दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या आयपीएल क्रिकेट लढतीत आज २९ धावांनी पराभव पत्करावा लागला. चौकार-षटकारांचा निरंतर पाऊस पडलेल्या या सामन्यात दिल्लीने पंजाबला दणका दिला तो वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या झंझावाती खेळीच्या बळावर. विजयासाठी २३२ धावांचे मोठे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न त्यांनी केला, तथापि मार्शला शेवटी साथ न मिळाल्यामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाच्या डेव्हीड वॉर्नर व वीरेंद्र सेहवाग यांनी धुव्वाधार फटकेबाजी केली. त्यांनी किंग्ज पंजाबच्या गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडविल्या. त्यांनी सलामीसाठी ११.४ षटकांत १४६ धावांची खणखणीत भागीदारी केली. वॉर्नर याने ४८ चेंडूंमध्ये ७७ धावा टोलविताना सात चौकार व चार षटकार अशी टोलेबाजी केली. सेहवागने वॉर्नरइतक्याच धावा केल्या. मात्र त्यासाठी त्याला फक्त ३५ चेंडूंचीच मदत घ्यावी लागली. त्याने चार षटकार व आठ चौकार अशी फटकेबाजी केली. ही जोडी खेळत असताना दिल्ली २५० धावा करणार असे वाटले होते, तथापि ही जोडी फुटल्यानंतर अपेक्षेइतका वेग ठेवण्यात त्यांना अपयश आले. तरीही शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकांमध्ये वेणुगोपाल राव याने तीन चौकार व एक षटकारासह नाबाद २८ धावा केल्या.
पंजाबने पॉल व्हल्थाटीची विकेट लवकर गमावली. तथापि त्यानंतर अ‍ॅडम गिलख्रिस्ट व शॉन मार्श यांनी दमदार खेळ करीत धावफलक हलता ठेवला. गिलख्रिस्ट ४२ धावांवर बाद झाला. त्याने आठ चौकारांबरोबरच एक षटकारही मारला. त्यानंतर खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत मार्शने चौफेर फटकेबाजी केली. तथापि शतक पूर्ण होण्यापूर्वीच तो बाद झाला. त्याने नऊ चौकार व सहा षटकारांसह ९५ धावा केल्या. तो बाद झाल्यावर त्यांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद २३१ (डेव्हीड वॉर्नर ७७, वीरेंद्र सेहवाग ७७, वेणुगोपाल राव नाबाद २८) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद २०२ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट ४२, शॉन मार्श ९५, डेव्हीड हसी २०, अजित आगरकर २/४८)


solapur pune pravasi sangatana