दिल्लीविरुद्ध पंजाबचे पारडे जड

नवी दिल्ली, २२ एप्रिल/पीटीआय
आयपीएलच्या चौथ्या हंगामात अजूनही लडखडत खेळणाऱ्या यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासमोर जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे पारडे चांगलेच जड वाटते आहे. चार लढतींत तीन पराभव स्वीकारणारा दिल्ली संघ गुणतालिकेत तळाला असून सलग तीन विजय मिळविणारा पंजाब संघ जबरदस्त फॉर्मात आहे. दिल्लीची फलंदाजी या स्पर्धेत पार ढेपाळली असली तरी पुणे वॉरियर्स विरुद्ध १८० धावांच्या आव्हानाचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला होता.
आयपीएल.च्या चौथ्या हंगामात दिल्ली संघाचा संपूर्ण चेहरामोहराच बदलला असून सामने जिंकून देऊ शकतील अशा फलंदाजांची उणीव त्यांना भासते आहे. गौतम गंभीर आणि तिलकरत्ने दिलशानसारखे फलंदाज दुसऱ्या फ्रँचाईजींकडे गेले याचा दिल्ली संघ व्यवस्थापनाला आता चांगलाच पश्चाताप होत असेल. कर्णधार विरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नर यांचा अपवाद वगळता त्यांच्या संघात एकही भरवशाचा फलंदाज दिसत नाही. मधल्या फळीत वेणूगोपाल राव, अ‍ॅरोन फिन्च आणि अष्टपैलू इरफान पठाणसारखे फलंदाज असले तरी या हंगामात त्यांना अद्यापही अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सेहवागचा हरवलेला फॉर्म हीदेखील दिल्ली संघासाठी चिंतेची बाब आहे आणि जरी तो फॉर्मात असला तरी प्रत्येक वेळी संघाला एकहाती विजय मिळवून देण्याची कामगिरी तो करू शकणार नाही. त्यामुळेच संघातील अन्य खेळाडूंनीही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडणे गरजेचे ठरणार आहे. युवा भारतीय खेळाडू नमन ओझा तसेच जेम्स होप्ससारख्या परदेशी खेळाडूलाही आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखविण्याची वेळ आली आहे. दिल्लीची गोलंदाजीची बाजूही मॉर्ने मॉर्केलचा अपवाद वगळता लंगडी वाटते आहे. त्यामुळेअशोक दिंडा, पठाण व होम्स यांनी मॉर्केलला चांगली साथ देण्याची गरज आहे.
याउलट किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ मात्र सध्या आत्मविश्वासाच्या लाटेवर स्वार झाला असून त्यांचे आघाडीचे फलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत. त्यांच्या मधल्या फळीला अद्याप संधीच न मिळाल्याने त्यांचा खरा कस लागलेला नाही. त्यामुळे आघाडीची फळी लवकर कोसळल्यास ही बाब घातकही ठरू शकेल. स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात डेक्कन चार्जर्सचा विजेतेपद मिळवून देणारा अ‍ॅडम गिलख्रिस्ट यंदा पंजाब संघाचे नेतृत्व करीत असून त्यांनी यंदा डेक्कन चार्जर्स आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचे धक्के दिले आहेत. कालच त्यांनी राजस्थान रॉयल्सला ४८ धावांनी हरविताना निर्विवाद वर्चस्व राखले होते. गिलख्रिस्ट, पॉल वल्थाटी, शॉन मार्श, दिनेश कार्तिक हे पंजाबचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात असून काल प्रवीणकुमार व रेयान हॅरिस यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती हे पाहता दिल्ली संघासाठी पंजाबला रोखणे कठीणच जाईल, असे चित्र दिसते आहे. 


solapur pune pravasi sangatana