धावांची भूक अजूनही पूर्वीसारखीच - सचिन

लंडन - सचिन तेंडुलकरच्या नावावर फलंदाजीचे बहुतेक सर्व विक्रम जमा असले, तरीही त्याची धावांची भूक काही कमी झालेली नाही. सचिनच्या एकवीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आणखी काही मिळविण्याचे शिल्लक राहिलेले नसले, तरीही अजून समाधान लाभलेले नाही, असे सचिनने सांगितले.

तो म्हणाला, "जेव्हा एखादा खेळाडू शतक करतो किंवा काही मिळवितो, तेव्हा "मी खूष झालो' असे म्हणतो; समाधानी झालो असे म्हणत नाहीत. "समाधान' म्हणजे प्रगतीच्या प्रवासातला "ब्रेक' असतो. एकवीस वर्षे खेळूनही मी अद्याप माझ्या कारकिर्दीवर समाधानी नाही. कारण, माझ्या मते, जेव्हा आपण समाधानी झाल्याचे मान्य करतो, त्या क्षणापासून लढण्याची इच्छा कमी होत जाते.''

निवृत्तीचा विचारही नाही
गेली दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो असलो, तरीही अद्याप निवृत्तीचा विचारही केला नसल्याचे सचिनने स्पष्ट केले. ""कारकिर्दीच्या सुरवातीला असलेले माझे क्रिकेटचे प्रेम आणि आताचे प्रेम, यात काहीही फरक नाही. क्रिकेटशिवाय मला प्रेरित करण्यासाठी आणखी कशाचीही गरज नाही. देशाचे प्रतिनिधित्व करणे, हे लहान असतानाचे माझे स्वप्न अजूनही कायम आहे. त्यामुळे क्रिकेटशिवाय आयुष्याचा मी विचारही करू शकत नाही,'' असे सचिनने सांगितले.

अजूनही सुधारणा आवश्‍यक
जवळपास सर्व विक्रम आपल्या नावे करणाऱ्या सचिनला आपल्या फलंदाजीमध्ये अजूनही काही त्रुटी आढळत असतात. याविषयी तो म्हणतो, ""मी अजूनही शिकतच आहे. माझ्या फलंदाजीमध्ये सतत काही ना काही बदल करणे मला आवश्‍यक वाटत असते. छोटेसे फुटवर्क किंवा बॅट स्विंग या गोष्टी बदलल्यानेही मोठा फरक पडतो आणि असे करणे मला फार आवडते.''

जगज्जेतेपदाविषयी...
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 28 वर्षांनी विश्‍वकरंडक जिंकणे, हा कारकिर्दीतील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे सचिनने नमूद केले. सर्व देश आतुरतेने या क्षणाची वाट पाहत असताना सचिन मात्र ड्रेसिंग रूममध्ये शांत बसून होता. विजयी षटकार मारल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रचंड जल्लोषानंतरच आपण विश्‍वकरंडक जिंकल्याची जाणीव झाल्याचे सचिनने सांगितले. दोन दशके वाट पाहिल्यानंतर अखेर "तो' क्षण आल्यानंतर एका वेगळ्याच विश्‍वात असल्यासारखे वाटल्याचे तो म्हणाला.

संयमाचे महत्त्व
मैदानावर कधीही भावनांचे प्रदर्शन न करण्यासाठी सचिनची ओळख आहे. याविषयी तो म्हणाला, ""कुठल्याही परिस्थितीमध्ये संयम ढळू न देणे मी वडिलांकडून शिकलो. त्यांच्याच मार्गावरून चालण्याचा मी प्रयत्न केला. याचमुळे कधीही तोल ढळला नाही.''


solapur pune pravasi sangatana