पंजाबचा खेळ खल्लास डेक्कनचा ८२ धावांनी विजय; अमित मिश्राचे हॅट्ट्रिकसह चार बळी

रमशाला, २१ मे
स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात बलाढय़ संघांना नमवत किंग्ज इलेव्हन पंजाबने बाद फेरीच्या दिशेने कूच केली होती. डेक्कनला नमवून पंजाब बाद फेरीचा उंबरठा ओलांडणार अशी साऱ्यांचीच अपेक्षा होती. पण त्यांची विजयी घौडदौड डेक्कन चार्जर्सने रोखत त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढले आहे. या पराभवामुळे पंजाबचा या स्पर्धेतून खेळ खल्लास झाला असून त्यांना आता बाद फेरीत पोहोचता येणार नाही. शिखर धवन आणि रवी तेजा या दोघांनी शतकी भागीदारी रचल्यामुळे डेक्कनला १९८ धावांचा डोंगर उभारता आला. तर अमित मिश्राच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर डेक्कनने पंजाबवर ८२ धावांनी मात करत सहजपणे सामना जिंकला. नाबाद ९५ धावांची खेळी साकारुन संघाच्या विजयाचा पाया रचणाऱ्या शिखर धवनला यावेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पंजाबला कोणत्याही परिस्थितीमध्ये डेक्कनला पराभूत करायचे होते. त्यामुळे डेक्कनची शिकार करण्यासाठी पंजाबच्या संघाने जबरदस्त तयारी केली होती. पण सारे फासे त्यांचे यावेळी उलटे पडले आणि शिकारी असलेल्या पंजाबचीच येथे शिकार झाली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच डेक्कनच्या संघाने पंजाबच्या संघावर वार करायला सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन आणि रवी तेजा यांनी १३१ धावांची सलामी देत जोरदार हल्ला चढवला. त्यांचा हा हल्ला एवढा जोरदार होता, की त्यापासून पंजाबला बचावच करता आला नाही. धवनने यावेळी ५७ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ९५ धावांची खेळी साकारत पंजाबच्या गोलंदाजीतली हवाच काढून टाकली. तर त्याला यावेळी रवी तेजाने ४१ चेंडूत ६० धावांची खेळी साकारत सुयोग्य साथ दिली. या दोघांनी दिलेल्या दमदार सलामीच्याच जोरावरच डेक्कनला २० षटकांमध्ये १९८ धावा करता आल्या. १९८ धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. पॉल व्हल्थाटी (५) आणि शॉन मार्श (१३) हे स्वस्तात तंबूत परतल्याने पंजाबच्या विजयाच्या आशा धुसर वाटत होत्या. पण एका बाजूने कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट किल्ला लढवत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही आणि गिलख्रिस्ट बाद झाल्यावर पंजाब बाद फेरीत पोहोचणार नाही, हे स्पष्टच झाले. बाद होण्यापूर्वी गिलख्रिस्टने ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५१ धावा फटकाविल्या. पंजाबचे बिनीचे फलंदाज बाद झाल्यावर त्यांना झटपट गुंडाळण्याची किमया अमित मिश्राने केली. हॅट्ट्रिकसह त्याने चार षटकांमध्ये एक षटक निर्धाव टाकत फक्त सात धावा देऊन चार विकेट्स पटकाविल्या.
संक्षिप्त धावफलक
डेक्कन चार्जर्स -: २० षटकांत २ बाद १९८ (शिखर धवन नाबाद ९५, रवी तेजा ६०, पॉल व्हल्थाटी २४ धावांत १ बळी) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब -: १९ षटकांत सर्वबाद ११६ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट ५१, अमित मिश्रा ७ धावांत ४ बळी) सामनावीर-: शिखर धवन.  


solapur pune pravasi sangatana