पंजाबच्या आशा कायम, दिल्लीवर २९ धावांनी दणदणीत विजय

धर्मशाळा, १५ मे
किंग्ज इलेव्हन पंजाब आपल्या अष्टपैल खेळाचे प्रदर्शन करताना गुणतालिकेतील तळाच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सवर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवित आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या प्ले-ऑफमध्ये खेळण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
पॉल व्हल्थाटी (६२) आणि शॉन मार्श (४७) यांच्या दमदार फटकेबाजीच्या बळावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १७० धावा उभारल्या. मग दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४१ धावसंख्येवर सीमित राखले. पंजाबने आता १२ सामन्यांत १२ गुण कमवित आपले आव्हान जिवंत राखले आहे.
१७१ धावांचे आव्हान स्वीकारणाऱ्या दिल्लीला रविवारी संघनायक वीरेंद्र सेहवागची उणीव तीव्रतेने भासली. दिल्लीच्या फलंदाजांनी पंजाबपुढे सपशेल लोटांगण घातले. अपवाद होता तो फक्त सर्वाधिक २९ धावा काढणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड न झालेल्या लेग-स्पिनर पियुष चावलाने १६ धावांत ३ बळी घेत दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. चावला सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. ३९ धावांत २ बळी घेणाऱ्या शलभ श्रीवास्तवने त्याला छान साथ दिली. प्रवीण कुमार, रियान हॅरिस आणि व्हल्थाटी यांनी प्रत्येकी एकेक विकेटस् घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १७० (पॉल व्हल्थाटी ६२, शॉन मार्श ४६, दिनेश कार्तिक २७; इरफान पठाण ३/२८, अविष्कार साळवी २/४०)
विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स
: नमन ओझा २८, डेव्हिड वॉर्नर २९; शलभ श्रीवास्तव २/३९, पियुष चावला ३/१६)


solapur pune pravasi sangatana