पंजाबला कार्तिक पावला

कोचीवर मिळवला सहा विकेट्सने विजय
इंदोर, १३ मे

महेला जयवर्धनेने कर्णधाराला साजेशी तडफदार अर्धशतकी खेळी साकारल्यामुळे कोची केरळ टस्कर्सला १७८ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबची २ बाद ३१ अशी अवस्था होती. त्यावेळी पंजाबचा संघ जिंकेल असे कोणाच्याही गावी नव्हते. पण पंजाबला आज कार्तिक पावला. त्याने फक्त ३३ चेंडूत ६९ धावांची अफलातून खेळी साकारत संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावरच पंजाबला कोचीवर सहा विकेट्स आणि सात चेंडू राखून विजय मिळवता आला. सामनावीराचा पुरस्कारही यावेळी पटकाविला तो कार्तिकनेच.

कोचीच्या १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाची सुरुवात निराशाजनकच झाली. कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट (९) आणि पॉल व्हल्थाटी (१७) ही सलामीची जोडी झटपट तंबूत परतली. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि शॉन मार्श यांनी संघाची पडझड थांबली नाही, तर संघाला विजयाच्या उंबरठय़ावर उभे केले. कार्तिकने यावेळी फक्त ३३ चेंडूत सात चौकार आणि पाच खणखणीत षटकार ठोकत ६९ धावा लूटल्या. तर मार्शने त्याला सुयोग्य साथ देत ३० चेंडूत ४२ धावांची खेळी साकारली. हे दोघे आर. पी. सिंगच्या १५ व्या षटकात बाद झाल्यावर सामना रंगात आला होता. पण डेव्हिड हसी (नाबाद २१) आणि मनदीप सिंग (नाबाद १५) यांनी कोचीच्या गोलंदाजीला जुगारले नाही. त्यांनी कोचीच्या गोलंदाजांवर चौफर हल्ला चढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, कर्णधार महेला जयवर्धनेच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर कोची केरळ टस्कर्स संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना १७८ धावा करता आल्या. ब्रेन्डन मॅक्क्युलम आणि जयवर्धने या सलामीच्या जोडीने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांचा सुरूवातीपासूनच खरपूस समाचार घेत संघाला ८.४ षटकांत ९३ धावांची दणदणीत सलामी करून दिली. या वेळी कोचीचा संघ आज दोनशेचा पल्ला गाठणार असे वाटत होते. पण ब्रेन्डन बाद झाला आणि त्यांचे सारे गणितच बिघडले. जयवर्धने एका बाजूने खिंड लवढत असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. तरी देखील त्याने एकाकी झुंज देत ५२ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७६ धावा फटकाविल्याने संघाला पावणे दोनशे धावा जमवता आल्या.
संक्षिप्त धावफलक
कोची केरळ टस्कर्स -:
२० षटकांत ७ बाद १७८ (महेला जयवर्धने ७६, ब्रेन्डन मॅक्क्युलम ३२, बिपुल शर्मा ३२ धावांत २ बळी) पराभूत वि. किंग्ज इलेव्हन पंजाब -: १८.५ षटकांत ४ बाद १८१ (दिनेश कार्तिक ६९, शॉम मार्श ४२, आर. पी. सिंग २५ धावांत ४ बळी) .
सामनावीर-: दिनेश कार्तिक


solapur pune pravasi sangatana